Raigad : हजार फूट दरीत कार कोसळून ८ ठार; आंबेनळी घाटातील दुर्घटना, अपघाताचा सुगावा १७ तासांनी  (Photo - FPJ)
महाराष्ट्र

Raigad : हजार फूट दरीत कार कोसळून ८ ठार; आंबेनळी घाटातील दुर्घटना, अपघाताचा सुगावा १७ तासांनी

रायगड जिल्ह्यात पोलादपूर -महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात एक स्कॉर्पिओ कार तब्बल १,००० फुटांपेक्षा जास्त खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.

Swapnil S

मुंबई : रायगड जिल्ह्यात पोलादपूर -महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात एक स्कॉर्पिओ कार तब्बल १,००० फुटांपेक्षा जास्त खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी पहाटे झालेल्या या अपघाताची खबर तब्बल १७ तासांनंतर रात्री उशिरा लागली आणि सोमवारी सकाळी बचाव कार्याला प्रारंभ झाला.

मुंबईपासून सुमारे १८० किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबेनळी घाट परिसरात रविवारी पहाटे ५ ते ६ च्या सुमारास घडला. अपघातातील सर्व जण दापोलीहून साताऱ्याकडे चालले होते. सोमवारी सकाळी ही अपघातग्रस्त कार दरीत आढळून आली, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

सातारा जिल्ह्यातील आठ तरूण दापोलीतील करदे समुद्रकिनाऱ्यावरून मौजमजा करून पुन्हा आपल्या गावाकडे परतत असताना ही दुर्घटना घडली. रविवारी पहाटेपासून गाडीतील एकाही तरुणासोबत मोबाईलद्वारे संपर्क होत नसल्याने  नातेवाईकांनी सातारा पोलिसांकडे संपर्क साधला आणि शेवटचे लोकेशन आंबेनळी घाटातील मृत्यूचे थैमान घालणाऱ्या 'दाभिळटोंक' येथे आढळून आल्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला असल्याचा सुगावा लागला.

याबाबत अधिक तपास केला असता दरीच्या दिशेचे क्रॅश बॅरियर्स एका ठिकाणी तुटल्याचे तसेच एका धक्क्यावर टायरमार्क्स दिसून आले. पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे आणि तहसिलदार कपिल घोरपडे तात्काळ तेथे पोचले. मात्र, काळोख्या रात्री गाडीचा शोध घेणे केवळ अशक्य असल्याचे जाणवल्याने सोमवारी सकाळी सूर्योदय होईपर्यंत थांबावे लागले.

पोलादपूर तालुक्यातील 'दाभिळटोंक' येथील अपघातप्रवण क्षेत्र दरीच्या बाजूने तकलादू स्वरूपाच्या क्रॅश बॅरियर्सचा उभारलेले आहेत. तीव्र वळणानंतर सरळ घाटरस्ता आणि पुन्हा वळण यामुळे कोणत्याही वाहनाचा वळल्यानंतर दरीच्या बाजूला झोक जाऊन वाहन दरीत कलंडण्याची अथवा नियंत्रण सुटून थेट तकलादू क्रॅश बॅरियर्सला धडकून दरीत झेपावण्याची शक्यता निर्माण होते. 

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटकडून याठिकाणी डोंगराचे कातळ फोडून रस्ता रूंदीकरण करण्यासोबत अपघातप्रवण क्षेत्राची तीव्रता कमी करण्याची आवश्यकता आहे.

मृतांची नावे

या दुर्घटनेतील मृतांची नावे रितेश लोखंडे (वय २२, रा. सातारा), सुहास लोखंडे (वय २०, रा. सातारा), उत्कर्ष शिंगटे (वय २१, रा. सातारा), निखिल शिंगटे (वय २५, रा. सातारा), महेश पवार (वय २५, रा. सातारा), आदित्य साळुंखे (वय २१, रा. सातारा), . राजेश काटकर (वय ३५, रा. सातारा), आणि अंश चव्हाण (वय १९, रा. रत्नागिरी) अशी आहेत.

दाभिळटोक - अपघातांचा योगायोग

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील 'दाभिळटोक' अनेकदा मृत्यूचे 'टकमकटोक' ठरत असल्याची चर्चा आहे. पहिल्यांदा 'दाभिळटोक' येथे झीटीव्हीचे संचालक झैदी यांची कार कोसळून झालेल्या अपघात संपूर्ण झैदी कुटुुंब ठार झाले होते. यानंतर याच ठिकाणी डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाची बस कोसळून एक व्यक्ती वगळता संपूर्ण बसमधील ३० प्रवासी कर्मचारी ठार झाले होते. 

सोमवारी पहाटेपासून रेस्क्यू सुरू

'दाभिळटोक' येथील अपघातस्थळी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रॅकर्स आणि सी-स्केप-महाडचे रेस्क्यू टीमच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता दोरखंडाच्या सहाय्याने दरीत उतरण्याची तयारी केली. सोमवारी सूर्योदय होताच दोरी दरीत सोडण्यात आली. दरी खूपच खोल असल्याने प्रशासनाने ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने खोल दरीत काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा शोध लावला. ही गाडी टप्पे खात आदळत आपटत खोल दरीत गेली असल्याच्या खुणा जागोजागी दिसून आल्या. मृतदेहही विखरून पडले होते. गाडीचा काळा रंग असूनही अनेक ठिकाणी जळल्यासारखा तांबडा पत्रा दिसून आल्याने दरीत कोसळल्यानंतर गाडीने पेट घेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे. रेस्क्यू टीमचे प्रमुख सागर दहिर्वेकर यांनीही अपघातस्थळी पोहोचून रेस्क्यू टीमच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केल्याने पहिला मृतदेह केवळ तासाभरातच दरीबाहेर काढण्यात यश आले.

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

भारतातील रुग्णालयांचे दर हे हिमनगाचे टोक; आरोग्य सेवा क्षेत्र भांडवलप्रधान असल्याचा नॅटहेल्थचा अहवाल

कोरमअभावी टाटा सन्सची AGM अखेर तहकूब

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह तत्काळ सुरू करा; महापौर रितू तावडेंचे निर्देश

परिणामांबाबतचा संदेश स्पष्ट; कृती, संवेदनशीलतेचे प्रदर्शन, Meta सोबतच्या चर्चेवर सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया