पुणे : हनी ट्रॅप प्रकरणाबाबत मी सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच पुण्यात माझ्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई मला बदनाम करण्यासाठी आखलेलं एक षड्यंत्र आहे, असा गंभीर आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी केला.
पुण्यातील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले, ‘या प्रकरणामागे कुणीतरी मास्टरमाइंड आहे. पोलीस केवळ बाहुल्यांसारखे काम करत आहेत.’
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे ३.३० वाजता खराडीतील एका स्टुडिओ अपार्टमेंटवर छापा टाकून ड्रग पार्टी उद्ध्वस्त केली होती. सात जणांना अटक करण्यात आली, ज्यात खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही समावेश होता.
खडसे म्हणाले, “पोलिसांच्या छाप्याच्या व्हिडीओजमध्ये स्पष्ट दिसते की संशयित अमली पदार्थ एका महिलेच्या पर्समध्ये आढळले. मग त्या महिलेला मुख्य आरोपी का ठरवले नाही? प्रांजलला का नंबर वन आरोपी बनवले? त्याचा पूर्वी कुठलाही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही.”
पोलिसांनी छाप्याचे व्हिडीओ आणि प्रांजलचे वैयक्तिक फोटो मीडियात सोडले. त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला, मग आमच्या कौटुंबिक फोटो लीक कसे झाले? हा खोटारडेपणाचा प्रकार आहे.