महाराष्ट्र

त्यांची बांधिलकी फक्त पैशांशी, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

प्रतिनिधी

मुंबई : आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले. त्यांची बांधिलकी फक्त पैशांशी आहे. बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभं करून घेतलं नाही त्यांच्यासोबत हे आज गेले. आम्हाला ‘एक फूल, दोन हाफ’ म्हणणारे हे ‘एक फुल, एक हाफ’ कधीही आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, हे कळणार नाही. उद्धव ठाकरे हे महागद्दार आहेत, त्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनाच प्रमुख लक्ष्य केले. “रक्ताचे नाते सांगणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला. त्यांची बांधिलकी फक्त पैशांशी. आपल्याला शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे दिल्यानंतर शिवसेनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये त्यांनी बँकेकडे मागितले. बँकेने नकार दिला. बँक म्हणाली, निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेंना दिली आहे. त्यांनी निर्लज्जपणे आम्हाला पत्र पाठवले. तुम्ही आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करता आणि ५० खोके आमच्याकडे मागता. या एकनाथ शिंदेंनी क्षणाचाही विलंब न लावता ५० कोटी द्यायला लावले. त्यांना खोके नव्हे तर कंटेनर पाहिजे, हे त्यांना जवळून ओळखणारे सांगतात. त्याचा एक साक्षीदार मी असून त्याविषयी योग्य वेळेला बोलेन,” अशी टीकाही त्यांनी केली.

“मी जीवाची पर्वा न करता काम करतो. इर्शाळगडावर जाऊ नका, असे सगळे म्हणाले होते. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता एकनाथ शिंदे चिखल तुडवत गडावर गेले. तुम्ही आलात, व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसलात आणि निघून गेलात. २६ जुलै २००५ च्या महापुरात वांद्र्यात सगळीकडे पाणी भरले होते. बाळासाहेबांना एकट्याला सोडून तुम्ही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये गेला होतात. बाळासाहेबांना पाण्यात सोडून गेलात. तुम्ही बाळासाहेबांचे होऊ शकत नाहीत, मग तुमचे आमचे काय होऊ शकणार, हा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यांना ज्यांचा काटा काढायचा असतो त्यांचा ते काढतात,” असेही शिंदे म्हणाले.

ते म्हणाले की, “शिवसेनेची काँग्रेस झाली तर दुकान बंद करीन, असे म्हणणारे बाळासाहेब होते. आता कदाचित उरलीसुरली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन केली तर आश्चर्य वाटायला नको. उद्या ते एमआयएम, ओवैसीसोबत युती करतील. हमास, हिजबुल, लष्कर-ए-तोयबा यांच्याशीही युती करतील. शिवसैनिक जगला काय, मेला काय, त्यांचे यांना काही देणेघेणे नाही. फक्त माझे कुटुंब, माझी जबाबदारी एवढेच यांना माहीत.”

मुख्यमंत्रीपदासाठी संधीसाधू

पवारांकडे दोन माणसे पाठवून मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करा, असे त्यांना सांगण्यात आले. २००४ सालापासून त्यांना ही इच्छा होती, पण जुगाड काही लागत नव्हता. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेच टुनकण उडी मारली आणि तिकडे खुर्चीवर जाऊन बसले. उद्धव ठाकरेंकडे एक चेहरा आहे, पण त्यामागे अनेक चेहरे दडलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, पोटातलं पाणी पण हलू दिले नाही. शेवटपर्यंत त्यांनी समजू दिले नाही. सीतेचं हरण करण्यासाठी रावणाने साधूचं रूप घेतलं होतं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी संधीसाधू बनले, अशी जहरी टीकाही शिंदेंनी ठाकरेंवर केली.

मराठ्यांना आरक्षण देणार म्हणजे देणारच

मराठा आरक्षणासाठी जस्टिस शिंदे यांची समिती दिवसरात्र काम करतेय. पुनर्विचार याचिका दाखल करून घेतली आहे. कोणावरही अन्याय न करता, कोणाचंही आरक्षण काढून न घेता, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार म्हणजे देणार. या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार. मात्र कृपा करून टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करू नका, आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका. आपल्या मागे असलेल्या मुलाबाळांचा विचार करा, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त