मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आलबेल नसल्याचे बुधवारी पुन्हा एकदा दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते. त्यामुळे शिंदे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा रंगू लागली आहे.
महायुती पुन्हा सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. पण भाजप देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ठाम राहिल्यामुळे अखेर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. तेव्हापासून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यात निर्माण झालेली दरी अद्यापही कायम असल्याचे अनेकवार दिसून आले आहे.
मध्यंतरी नाराज असलेले शिंदे हे आपल्या दरे गावी जाऊन राहिले होते. त्यानंतरही अनेकदा त्यांनी फडणवीस यांनी आयोजित केलेल्या महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहणे टाळले होते. तर दुसरीकडे शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात घेतलेले काही निर्णय फडणवीस यांनी रद्द केले वा स्थगित केले. त्यामुळे त्यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
केसरकरांची सारवासारव
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली, याचा अर्थ दोघांमध्ये नाराजी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांचे नियोजित कार्यक्रम असल्याने ते सह्याद्री अतिथीगृहात बैठकीस जाऊ शकले नसतील, अशी सारवासारव दीपक केसरकर यांनी केली.
कोकणी माणूस बाळासाहेबांचे विचार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मानणारा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे कोकणावरील प्रेम बेगडी आहे, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली.
“चांदा ते बांदा योजना अर्थ खात्याने बंद केली होती. ती पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आदेश आवश्यक होते, मात्र तेव्हाही उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसले. कोकणाच्या विकासासाठी एक शब्ददेखील टाकला नाही. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यासाठी कोकणी माणसाचा वापर केला जातो,” असा हल्लाबोल केसरकर यांनी केला.
याउलट एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर लगेच काजू बोर्डाला १५०० कोटींचा निधी दिला, असे केसरकर म्हणाले. काजू उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने पहिल्यांदाच आर्थिक मदत केली. काजू बोंडाशी संबधित उद्योगांबाबतचा प्रयोग यशस्वी झाल्यास कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना ३००० कोटींचा फायदा होईल, असे केसरकर म्हणाले. त्यामुळेच संपूर्ण कोकण किनारपट्टी ही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वासोबत राहिली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतून कोकणी जनता मूळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतच असल्याचे शिक्कामोर्तब झाले, असेही ते म्हणाले.