मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पुणे महापालिका आयुक्तांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत पावलेले संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिले.
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हल्ल्यानंतर जगदाळे कुटुंबाला दिलेल्या आश्वासनानुसार आसावरीला शासकीय नोकरी देण्यात येईल. त्यानुसार शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याशी चर्चा केली. शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असून पुणे महापालिका त्यांच्या कार्यक्षेत्रात येते.
निवेदनानुसार, आसावरीशीही संपर्क साधून तिच्या शैक्षणिक पात्रतेची चौकशी करण्यात आली. तिच्या योग्य शैक्षणिक पात्रतेनुसार सेवेत समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘सरकार या मुद्द्याबाबत संवेदनशील असून सहानुभूतीच्या आधारावर असावरीला शक्य तितक्या लवकर शासकीय सेवेत सामावून घ्यावे,’ असे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला दहा महिने उलटूनही आसावरी अजूनही राज्य सरकारने दिलेल्या नोकरीच्या आश्वासनाची पूर्तता होण्याची वाट पाहत आहे. सोमवारी पुण्यात आपली चिंता व्यक्त करत असताना भाजप नेते नवनाथ बन यांनी हा विलंबाचा मुद्दा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडण्याचे आश्वासन दिले.
आसावरीचे वडील संतोष जगदाळे हे २२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरण घाटीत दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांपैकी एक होते. या हत्याकांडानंतर राज्य सरकारने महाराष्ट्रातील सहा पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच त्यांच्या निकटवर्तीयांना शासकीय नोकरी देण्याची घोषणा केली होती.