कोल्हापूर येथील लक्षतीर्थ वसाहत परिसरातील आलिफ अंजुमन मदरशाचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना जमावाने अटकाव केल्याने मोठा तणाव निर्माण झाला. या परिसरातील मुस्लिम समाजातील नागरिकांनी मदरशाचे अतिक्रमण हटवण्यास विरोध केला. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह पोलिसांसोबत जमावाने हुज्जत घातली. यामुळे या ठिकाणी निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती पाहाता प्रशासनाला अतिक्रमण न काढता माघारी फिरावे लागले.
लक्षतीर्थ वसाहतमधील मदरसा अनधिकृत आहे, अशी मागणी करत विश्व हिंदू परिषदेने त्यावर कारवाई करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. तर, मदरसा व्यवस्थापनाने केलेल्या अपिलवर 2 फेब्रुवारी रोजी सुनावणी असताना त्यापूर्वीच कारवाई का केली जात आहे? असा सवाल मुस्लिम समाजाकडून करण्यात आला. यावेळी स्थानिकांनी घोषणाबाजी केल्यामुळे गोंधळात अजून भर पडली. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून या परिसरात सध्या तणापूर्ण शांतता आहे.
144 कलम लागू-
महापालिकेचे कर्मचारी मदरशाचे अतिक्रमण काढण्यास गेले यावेळी या परिसरात मोठा जमाव जमा झाला. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी या परिसरात कलम 144 लागू केले आहे. या परिसरात येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात असून ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे त्यांनाच वसाहतीमध्ये जाऊ दिले जात आहे.
लक्षतीर्थ वसाहत शांतता कमिटीने सदरची कारवाई पुढे ढकलावी, अशी मागणी करणारे निवेदन कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहे. तसेच, या भागातील व्यक्ती व समाजाची या मदरशाविषयी कोणतीही तक्रार नाही. बाहेरील व्यक्ती आणि संघटना यांनी केलेल्या तक्रारीवरुन कारवाई होत आहे. पण त्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शांतता कमिटीमार्फत करण्यात आली आहे.