राज्यात कुठेही इंधन तुटवडा नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती; मोदी सरकार स्थितीचा सामना करण्यास सक्षम  प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

राज्यात कुठेही इंधन तुटवडा नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती; मोदी सरकार स्थितीचा सामना करण्यास सक्षम

इराण विरुद्ध इस्रायल- अमेरिका युद्धामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही... प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार भविष्यातील स्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे, असे ते म्हणाले.

Swapnil S

मुंबई : इराण विरुद्ध इस्रायल- अमेरिका युद्धामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही. काही शहरांत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण मोठ्या रांगा लागल्या. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार भविष्यातील स्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे, असे ते म्हणाले.

गॅस सिलिंडर वितरणावर ठराविक दिवसांची कॅप

आखातातील इराणविरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धाचा फटका अवघ्या जगाला बसत आहे. त्याच्या झळा आता महाराष्ट्रातही पोहोचल्या आहेत. सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ६० रुपयांची वाढ केली. तसेच त्याच्या वितरणावरही काही ठराविक दिवसांची कॅप लावली. विशेषतः तेल कंपन्यांनी पुण्यातील वितरकांना पैसे दिल्याशिवाय इंधन देण्यास नकार दिल्यामुळे राज्यात इंधन टंचाई निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे.

बातम्यांमुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण रांगा

मुख्यमंत्री म्हणाले, लोकांना चुकीची माहिती देऊन पॅनिक तयार करण्याची गरज नाही. केंद्र सरकारने यासंदर्भातील आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशाप्रकारे पावले उचलली हे आपल्यासमोर आले आहे. सध्या राज्यात कुठेही इंधन टंचाई नाही. काही माध्यमांनी दोन-तीन दिवस झाले पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या बातम्या दिल्या. त्यामुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण मोठमोठ्या रांगा लागल्या. असा कोणताही तुटवडा नाही. केंद्र सरकारनेही हे स्पष्ट केले आहे. भविष्यात जी परिस्थिती उद्भवेल, त्याचा सामना करण्यासाठी भारत सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे तयार आहे.

पुण्यात महिलांनी व्यक्त केला तीव्र संताप

उल्लेखनीय बाब म्हणजे इराण युद्धामुळे सध्या भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारने व्यावसायिक गॅसच्या दरात अचानक १५० ते २०० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय कसा चालवायचा? हा प्रश्न व्यावसायिकांपुढे उभा राहिला आहे. दुसरीकडे, घरगुती गॅसच्या दरातही एकरकमी ६० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचेही बजेट कोलमडले आहे. त्यातच काही शहरांत गॅसचा पुरवठा कोलमडल्यामुळे स्थिती बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पुण्यातील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. देशात गॅसचे दर वाढत आहेत. तेलाचे दर वाढत आहेत. किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढले आहेत. पण आमचे पगार काही वाढत नाहीत. गॅस एजन्सीकडे गेल्यानंतर अनेक वेळा वेळेवर गॅस मिळत नाही, अशी ओरड या महिलांनी केली आहे.

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

कोलंबियात ७.४ तीव्रतेचा भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : फेरीवाल्यांच्या ओळखपत्रासाठी पावणेदोन कोटींचा खर्च

१५ किलोमीटरसाठी दीड तास! कल्याण-बदलापूर महामार्गावर खड्डे, पाणी अन् कोंडी