मुंबई : राज्यात धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पोलिस प्रशासनाला दिले. नाशिक धर्मांतर प्रकरण, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण, भोंदूबाबा खरात आणि मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरणांचा तपास अधिक प्रभावी आणि निष्पक्ष करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत गृह विभागाचा सविस्तर आढावा घेताना विविध संवेदनशील प्रकरणात योग्य तपास करून कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले. या बैठकीला राज्याचे पोलिस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
परतवाडा, खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा!
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात पीडितांना तक्रार देण्यासाठी विश्वास देणे आवश्यक आहे. त्यासाठी समुपदेशनाची मदत घेण्याची सूचना देण्यात आल्या. संबंधित प्रकरणात समाजसेवकांचा सहभाग वाढवून पीडितांना आधार देण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. खरात प्रकरणात पीडितांचा विश्वास जिंकणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले. या प्रकरणात दोषी कोणीही असो, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी भक्कम पुरावे गोळा करण्याचे आदेश त्यांनी दिले. न्यायालयात खटला मजबूत होण्यासाठी तपासाची दिशा ठोस ठेवावी आणि अपराध सिद्धी हा केंद्रबिंदू असावा, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली.
नाशिक धर्मांतर प्रकरणात 'झिरो टॉलरन्स'
नाशिकमधील धर्मांतराच्या प्रकरणावर बोलताना फडणवीस यांनी धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका, असे पोलिसांना स्पष्टपणे बजावले. हे प्रकरण स्वतः हून उजेडात आणल्याबद्दल त्यांनी नाशिक पोलिसांचे कौतुक केले. मात्र, आता तपास तितकाच दमदार व्हावा, यात असणाऱ्या सर्व पॅटर्नचा तपास करा. कोणताही मुद्दा तपासातून सुटू नये, असे स्पष्ट केले.
ड्रग्ज प्रकरणात कारवाईला वेग द्या!
गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात कारवाईला वेग द्या, असे निर्देश देत राज्यभर ड्रग्जविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया करण्याचे आदेश त्यांनी दिले. तरुणाईच्या भविष्याशी निगडित हा मुद्दा असल्याने अशा प्रकरणांकडे गांभीर्याने पाहावे, असेही ते म्हणाले.