खरातशी फोन संभाषणाची माहिती फुटल्याची चौकशी; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 
महाराष्ट्र

खरातशी फोन संभाषणाची माहिती फुटल्याची चौकशी; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरातला केलेल्या कथित फोन कॉलची माहिती फुटली कशी याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले. खरातच्या मालमत्तेची ईडीमार्फत चौकशी केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

Swapnil S

नाशिक : स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरातला केलेल्या कथित फोन कॉलची माहिती फुटली कशी याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले. खरातच्या मालमत्तेची ईडीमार्फत चौकशी केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी १७७ वेळा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ वेळा खरातशी फोनवरून संभाषण केले होते, असा कथित तपशील अंजली दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वी उघड केला होता. पोलीस तपास चालू असताना हा तपशील कसा फुटला, याची जोरदार चर्चा चालू आहे. शिंदे यांना राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्याचा हा प्रयत्न आहे की काय, असे बोलले जात होते. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचे हे वक्तव्य आले आहे.

फोनवरील संभाषणाचे हे तपशील किंवा कॉल डेटा रेकॉर्ड मिळवण्याचा कोणालाही अधिकार नाही, केवळ अधिकृत यंत्रणाच ते करू शकतात, असे फडणवीस यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. हा तपशील कसा फुटला याचा तपास करून संबंधित दोषींवर कडक कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले

संवेदनशील प्रकरणांमध्ये केवळ आरोप पुरेसे नसतात; ठोस पुराव्यांच्या आधारेच कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

भोंदूबाबा खरातला मार्च महिन्यात अटक करण्यात झाली असून आतापर्यंत त्याच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल झाले आहेत. तपासादरम्यान लैंगिक छळ, जमीन आणि इतर मालमत्तेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारांसह अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.

शिंदे यांची वाटचाल रोखण्याचा प्रयत्न- सामंत

मुंबई : अशोक खरातशी एकनाथ शिंदे यांच्या कथित फोन संभाषणांची माहिती उघड झाल्याबद्दल शिवसेनेचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी संताप बोलून दाखवला आहे. शिंदे यांच्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या एका नेत्याच्या मार्गात मुद्दाम राजकीय अडथळे निर्माण केले जात असल्याची भावना लोकांमध्ये वाढत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सामंत यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सामंत म्हणाले की, आमच्या नेत्याला लक्ष्य केले जात आहे अशी पक्ष कार्यकर्त्यांची भावना होऊ शकते. मात्र अशा आरोपांमुळे शिंदे यांच्या कार्यावर किंवा नेतृत्वावर कोणताही परिणाम होणार नाही. अशा आरोपांमुळे शिंदे यांच्याबद्दल लोकांमधील जिव्हाळा अधिक वाढेल असा दावा त्यांनी केला. विशिष्ट व्यक्तींबाबतचे तपशील उघड करण्याऐवजी या संपूर्ण सीडीआर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी शिवसेनेची भूमिका आहे, असे ते म्हणाले. शिंदे हे एनडीएचे तिसऱ्या क्रमांकाचे नेते आणि सामान्य माणसाचा आवाज आहेत याची त्यांनी आठवण करून दिली.

US-Iran-Israel War : वैमानिकाची थरारक सुटका; अमेरिकेची 'ऐतिहासिक' मोहीम : शेकडो कमांडो, डझनभर लढाऊ विमानांचा सहभाग

Mumbai : एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा; दोन वर्षांत नवा दुमजली पूल उभारणार

सुनेत्रा पवारांची सर्व सूत्रे पार्थ-जय पवारांकडे

एप्रिल महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य,६ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत