महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी वीजबिल भरण्याची गरज नाही, अजितदादांचा शेतकऱ्यांना वादा; नाशिक येथून जनसन्मान यात्रेस प्रारंभ

Swapnil S

मुंबई : हे राज्य सरकार कुणासाठी आहे, तर तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी खर्च करायचा नाही तर कुणासाठी खर्च करायचा. यापुढे सर्व मुलींना मोफत शिक्षण देणार आहे. वर्षाला तीन सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांचे शेतीचे वीजबिल माफ केले आहे. मागचे पण आणि पुढचेही वीजबिल भरायचे नाही. वायरमन विचारायला आला तर त्याला माझे नाव सांगा. काळजी करू नका, हे सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा वादा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी गुरुवारी केला.

लोकसभा निवडणुकीत झाले ते विसरू नका. विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार आणण्यासाठी आशीर्वाद द्या, अशी सादही त्यांनी राज्यातील जनतेला घातली. राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा प्रारंभ गुरुवारी नाशिक- दिंडोरी येथून झाला. त्यावेळी ते बोलत होते. माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे. तीन दशकांपासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन जसे स्वराज्य उभे केले, त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून, त्यांचे दु:ख, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. महिला, युवा-युवती, शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या आहेत. जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे. आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत, अशा शब्दांत अजित पवार यांनी 'जनसन्मान' यात्रेत जनतेला आश्वासित केले.

कांदा निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येतो. त्या कांद्याने पार वांदे केले आहेत. त्यामुळे कांदा निर्यातबंदी उठवा, असेही केंद्र सरकारला सांगितले आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या महिला धोरणातून महिलांना मान-सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही अर्ज भरले जात आहेत. घाबरू नका, तुम्हाला योजनेचे पैसे मिळत नाही, तोपर्यंत हा अजित पवार तुमच्या पाठीशी उभा आहे, असा शब्द पवार यांनी लाडक्या बहिणींना दिला.

१७ ऑगस्टपर्यंत बहिणींच्या खात्यात पैसे

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून १५०० रुपयांची रक्कम प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात १७ ऑगस्टपर्यंत जमा होईल. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर ६ हजार कोटी रुपयांच्या फाइलवर सही करून इथे आलो आहे. हा चुनावी जुमला नाही, तुम्ही साथ द्या, ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, हा अजितदादाचा वादा आहे, असा विश्वास त्यांनी महिलांना दिला.

या जनसन्मान यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आमदार नितीन पवार, माजी खासदार समीर भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काळाराम मंदिरात घेतले दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 'जनसन्मान' यात्रेनिमित्त नाशिक जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी नाशिक शहरातील पंचवटी परिसरात असणाऱ्या प्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये पूजा करून दर्शन घेतले.

महायुतीच्या घटक पक्षांना मिळणार आपापल्या विद्यमान जागा

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी जागावाटपाचे सूत्र ठरविताना राज्यातील सत्तारूढ आघाडीमधील घटक पक्षांकडे विद्यमान मतदारसंघ कायम राहतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. काही मतदारसंघांत बदल करणे गरजेचे असल्यास त्यासाठी महायुतीमधील घटक पक्ष तयार आहेत, जागावाटपाचे सूत्र लवकरच निश्चित केले जाईल, असेही ते म्हणाले. कोणत्याही समाजाला नाराज करण्याची आपल्या पक्षाची इच्छा नाही, असे पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला