मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल १० दिवसांनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्यात आले. मात्र एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही, यावरील पडदा बुधवारी सायंकाळी पडला. भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सायंकाळी ‘वर्षा’ बंगल्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बंद दाराआड जवळपास अर्धा तास झालेल्या चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्यास सहमती दर्शवली असल्याचे समजते. त्यामुळे फडणवीस यांना शिंदेंची मनधरणी करण्यात यश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.दरम्यान, उद्या गुरुवारी आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर अजित पवारदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येते.
एकनाथ शिंदे यांना गृहखाते मिळावे, अशी शिवसेनेची मागणी आहे. पण भाजप हे खाते सोडण्यास तयार नाही. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी गृहखाते आपल्याकडे ठेवले होते. त्यामुळे आता शिंदे हे उपमुख्यमंत्री होत असल्याने त्यांनादेखील हे खाते मिळावे, अशी शिवसेनेची मागणी होती. मात्र बुधवारी सायंकाळी ‘वर्षा’ बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांची भेट घेत यावर तोडगा काढल्याने एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यास तयार असल्याचे समजते.
हे संभाव्य मंत्री घेणार शपथ
भाजप
देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री व गृहमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे - मंत्री , चंद्रकांत पाटील - मंत्री
पंकजा मुंडे - महिला व बालकल्याण मंत्री
गिरीश महाजन , आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, अतुल सावे
सुधीर मुनगंटीवार - वनमंत्री , नितेश राणे, गणेश नाईक
मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, अतुल भातखळकर, शिवेंद्रराजे भोसले
गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील,
जयकुमार रावल
राष्ट्रवादी काँग्रेस
अजित पवार - उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री
धनंजय मुंडे - कृषीमंत्री, छगन भुजबळ , हसन मुश्रीफ
दिलीप वळसे पाटील, अदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम
शिवसेना शिंदे गट
एकनाथ शिंदे - उपमुख्यमंत्री
दीपक केसरकर - शिक्षणमंत्री, उदय सामंत,
शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील