Fuel Price Hike : राज्यात पेट्रोल, डिझेल विक्रीत २० टक्क्यांनी वाढ (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

Fuel Price Hike : राज्यात पेट्रोल, डिझेल विक्रीत २० टक्क्यांनी वाढ

पश्चिम आशियातील संकटामुळे इंधन पुरवठ्यात अडथळा येण्याच्या भीतीने नागरिकांनी केलेल्या अतिरिक्त खरेदीमुळे मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे २० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

Swapnil S

मुंबई : पश्चिम आशियातील संकटामुळे इंधन पुरवठ्यात अडथळा येण्याच्या भीतीने नागरिकांनी केलेल्या अतिरिक्त खरेदीमुळे मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे २० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

राज्य अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मे २०२६ च्या पहिल्या १५ दिवसांत डिझेलच्या विक्रीत १९.६६ टक्के आणि पेट्रोलच्या विक्रीत २०.३९ टक्के वाढ झाली आहे. भीतीपोटी ग्राहकांनी अचानक केलेल्या खरेदीमुळे राज्यात इंधनाची मागणी तात्पुरती वाढली असली, तरी पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असून सर्व मागणी पूर्ण करण्यात आली आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात पेट्रोल किंवा डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून इंधनाची साठवणूक किंवा अनावश्यक खरेदी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १९ मे रोजी अकोला जिल्ह्यात डिझेलची विक्री सरासरीपेक्षा १११ टक्के तर वाशीममध्ये १०९ टक्क्यांनी वाढली होती. याच दिवशी जळगावमध्ये ७२ टक्के आणि बीडमध्ये ६३ टक्के अधिक डिझेलची विक्री झाली. पेट्रोल विक्रीत वाशीम ४२ टक्क्यांसह आघाडीवर होते, तर जळगावमध्ये ४० टक्के वाढ नोंदवली गेली.

ग्रामीण भागात इंधनाला अभूतपूर्व मागणी

अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, धाराशिव, परभणी आणि वाशीम या ११ जिल्ह्यांमध्ये इंधनाला अभूतपूर्व मागणी होती. १९ मे रोजी अकोल्यात सरासरी ३६९ लिटरऐवजी ७७९ लिटर डिझेलची विक्री झाली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ८६० लीटर पेट्रोल आणि १,७५७ लिटर डिझेलची विक्री झाली, जी सरासरीपेक्षा अनुक्रमे १८२ लिटर आणि ५७९ लिटर जास्त होती.

बीडमध्येही पेट्रोल ८० लिटरने तर डिझेल ४५९ लिटरने अधिक विकले गेले. इंधनाचा पुरेसा साठा असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे विभागाने नमूद केले.

Mumbai : टॅक्सी, रिक्षांच्या मीटरचे फेरप्रमाणीकरण ३० नोव्हेंबरपर्यंत; १ सप्टेंबरपासून मुंबईत रिक्षा, टॅक्सींचे भाडे वाढणार

नियम तोडाल तर कारवाई होणारच; मुंढेंचा इशारा; सणासुदीत भेसळयुक्त विक्रेत्यांवर FDA ची नजर, नवी नियमावली आज करणार जारी

मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचा विरोध

ओबीसी 'क्रिमीलेयर' निकषाबाबत १ सप्टेंबरला सुनावणी

बुलेट ट्रेनचा खर्चही सुस्साट! मुंबई-अहमदाबाद प्रकल्पाचा खर्च झाला दुप्पट; १ लाख कोटीवरून २ लाख कोटी