गडचिरोलीत सर्पदंशाने तीन मुलींचा मृत्यू; आदिवासी आश्रमशाळेतील प्रकार, तीन जणींवर उपचार सुरू 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

गडचिरोलीत सर्पदंशाने तीन मुलींचा मृत्यू; आदिवासी आश्रमशाळेतील प्रकार, तीन जणींवर उपचार सुरू

गडचिरोली जिल्ह्यातील एका अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात मध्यरात्री ६ विद्यार्थिनींना विषारी साप चावल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या सर्पदंशामुळे तीन मुलींचा मृत्यू झाला असून, तीन विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Swapnil S

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एका अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात मध्यरात्री ६ विद्यार्थिनींना विषारी साप चावल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या सर्पदंशामुळे तीन मुलींचा मृत्यू झाला असून, तीन विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

ही घटना धानोरा तालुक्यापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात रविवारी मध्यरात्री घडली. वसतिगृहात जमिनीवर झोपलेल्या विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केला. या दुर्घटनेत ८, १२ आणि १४ वर्षे वयाच्या तीन मुलींचा मृत्यू झाला. तर ११ ते १४ वयोगटातील अन्य तीन विद्यार्थिनींवर सध्या उपचार सुरू आहेत.

जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नेमकी कशी घडली, विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या ठिकाणी पुरेशा सुरक्षा उपाययोजना होत्या की नाही, तसेच शाळा व्यवस्थापनाने आवश्यक सुरक्षेचे नियम पाळले होते का, याची सखोल चौकशी केली जाईल. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत शाळेच्या सुरक्षा व्यवस्थांची सखोल तपासणी केली जाईल असे स्पष्ट केले.

उपचाराधीन तीनही विद्यार्थिनींना तातडीने अँटी-व्हेनम (विषरोधक औषध) देण्यात आले असून वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. उपचारात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत. आदिवासी विकास विभागाचे पथक घटनास्थळाची पाहणी करून सविस्तर माहिती गोळा करणार आहे. चौकशीदरम्यान हलगर्जीपणा किंवा सुरक्षेतील त्रुटी आढळल्यास जबाबदारी निश्चित करून नियमानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : एनटीसी गिरणी कामगारांचा आत्महत्या करण्याचा इशारा; कामगारांना पगार व पेन्शनची प्रतीक्षा

Mumbai : अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; साकीनाका, पवईत 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत एल विभागाची कारवाई

यंदा व्याजदर वाढ? वाढत्या महागाईमुळे रिझर्व्ह बँक पतधोरणात बदल करणार

ICC World Cup 2027 : खेळाडूंच्या दुखापती, व्यस्त वेळापत्रकामुळे सर्वोत्तम संघ निवडणे कठीण - गिल