मुंबई : गणपती म्हणजे उत्साह, चैतन्याचे प्रतीक. 'गणपती घरी येणार' या कल्पनेनेच संपूर्ण घरात चैतन्य पसरते. गरीबांपासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला गणपतीची तितकीच ओढ असते. भक्तांना आपल्या सर्व चिंता, त्रास विसरायला लावणाऱ्या व सर्वत्र आनंद, चैतन्य अन् मंगलमयतेची उधळण करणाऱ्या विघ्नहर्ता श्री गणरायाचे बुधवारी ढोलताशांच्या गजरात दिमाखात मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यात व देशात आगमन होणार आहे. यंदा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात गणेशोत्सव साजरा होणार आहे.
श्री गणेशाच्या आगमनासाठी ठिकठिकाणची शहरे सज्ज झाली आहेत. घरोघरी गणपतीच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारने गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सवा'चा दर्जा दिला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
यंदा गणपतीचे आगमन नेहमीपेक्षा लवकर होत आहे. गणपतीच्या स्वागतासाठी घराघरामध्ये जोरदार तयारी सुरू आहे. दीड, पाच, सात, दहा, अकरा दिवसांच्या गणपतीची घराघरात प्रतिष्ठापना होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सुंदर सजावट, दिव्यांची आरास, गोडधोड नैवेद्याचा बेत घराघरात तयार करण्यात येत आहे. गणपती बघण्यासाठी पाहुण्यांची रेलचेल घराघरात असते. मोदक, पुरणपोळी, बासुंदी आदी मिष्ठान्नाचे नवनवीन बेत घराघरात आखले जात आहेत. लहान मुलांसह आबालवृद्धांमध्ये गणपतीनिमित्त उत्साह पसरला आहे. श्रीगणेश चतुर्थीनिमित्त पूजा सांगण्यासाठी ब्राह्मणवृंदाना मोठी मागणी आहे. चतुर्थीनिमित्त ब्राह्मणांना २७ ऑगस्टला पहाटेपासून पूजा सांगण्यासाठी बोलवणे धाडण्यात आले आहे. ज्यांना गणेश पूजेसाठी ब्राह्मण मिळत नाही, त्यांनी यूट्यूबवरून पूजा व मंत्रोच्चाराचा वापर करण्याचे ठरवले आहे.
गणपतीसाठी आवडणाऱ्या दुर्वा, जास्वंदासह अन्य फुलांना मोठी मागणी वाढली आहे. फुलांची मागणी वाढल्याने व पुरवठा कमी असल्याने त्याच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ झाली आहे.
गणेशोत्सवासाठी कडक सुरक्षा व्यवस्था
गणपतीसाठी लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी कडेकोट सुरक्षा पोलिसांनी ठेवली आहे. मुंबई पोलिसांनी यंदा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरक्षेसाठी करण्याचे ठरवले आहे. गर्दीवर नियंत्रण व लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी खास नियोजन केले आहे. यासाठी १७ हजार पोलीस तैनात केले आहेत. त्यात १४,४३० कॉन्स्टेबल, २,६३७ पोलीस अधिकारी, ५१ सहाय्यक पोलीस आयुक्त, ३६ पोलीस उपायुक्त आदींवर गणेशोत्सवाच्या सुरक्षेची जबाबदारी असेल.
सार्वजनिक गणेशोत्सवात विविध देखाव्यांचे आकर्षण
घरगुती गणेशोत्सवाबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव हे मुंबई, पुण्यात लोकप्रिय आहेत. फुलांनी सजलेल्या आणि विद्युत रोषणाई नटलेल्या आकर्षक मंडपात गणपती पाहायला लाखो लोक गर्दी करत असतात. मुंबईत 'लालबागचा राजा', चिंचपोकळीचा 'चिंतामणी', जीएसबी गणपती, गणेशगल्ली, गिरगावचा राजा, परळचा राजा, खेतवाडीच्या विविध गल्ल्यातील गणपती पाहायला लाखो भाविक दहा दिवसांत गर्दी करतात.