मुंबई: गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार...च्या जयघोषाने सोमवारी गणेश चतुर्थीला राज्यातील घराघरात आणि सार्वजनिक मंडळाच्या मंडपात गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात वाजत गाजत, ढोल ताशाच्या गजराने सोमवारी मुंबईच्या रस्त्यांवर भक्तिमय वातावरण निर्माण झाले. विविध आकारांच्या गणेशमूर्ती घराघरांत तसेच शहरातील सार्वजनिक मंडपांमध्ये विराजमान झाल्या असून, त्यामुळे मुंबईत ११ दिवसांच्या गणेशोत्सवाची भव्य सुरुवात झाली आहे.
लालबागच्या गजबजलेल्या अरुंद गल्ल्यांपासून ते आकर्षक कलाकुसरीने सजवलेल्या सार्वजनिक मंडपांपर्यंत सर्वत्र गणेशभक्तीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विघ्नहर्त्याचे आगमन मुंबईकरांना श्रद्धा आणि उत्सवाच्या धाग्याने एकत्र बांधणारे ठरत आहे.
मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी गेल्या काही आठवड्यांपूर्वीच त्यांच्या भव्य मूर्ती मंडपांमध्ये आणल्या आहेत. मात्र, लहान मंडळे आणि घरगुती गणपतींचे आगमन रविवारी रात्रीपासून सुरू झाले. भक्तिगीते, ढोल-ताशे, रस्त्यावरील वाद्यसंगीत आणि गुलालाच्या उधळणीत गणरायाला घरी आणण्यात आले.
‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याने अधिकृत गणेशोत्सवाला सुरुवात झाली. घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांनी विधिवत पूजा, आरती आणि मंत्रोच्चार करत गणरायाची प्रतिष्ठापना केली. घराघरात गणपती आल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाडक्या बाप्पासाठी घरोघरी मोदकाचा नैवैद्य दाखवण्यात आला.
लालबाग, परळ, गिरगाव, अंधेरी, चेंबूर आणि फोर्ट या प्रमुख परिसरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दादर, क्रॉफर्ड मार्केट आणि लोहार चाळ येथील बाजारपेठांमध्येही शेवटच्या क्षणी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. पारंपरिक ‘मखर’ सजावट, ताज्या फुलांच्या माळा, मिठाई तसेच पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली.
लालबाग हा गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू ठरला असून, लालबागचा राजा, चिंचपोकळी, गणेश गल्ली आणि तेजुकाया यांसारख्या प्रसिद्ध मंडळांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.
माटुंगा येथील जीएसबी सेवा मंडळाने यंदाही आपल्या गणेशमूर्तीला मौल्यवान सोन्याच्या दागिन्यांनी सजवले आहे. या अलंकारांच्या सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपयांचे विमा संरक्षण घेण्यात आले आहे. मंडळाच्या दैनंदिन धार्मिक विधींसाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
टिळक नगर येथील सह्याद्री मंडळ, दक्षिण मुंबईतील फोर्ट विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अंधेरीतील आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती तसेच गिरगावातील खेतवाडी गणपती मंडळे ही भाविकांची प्रमुख आकर्षणे ठरली आहेत.
पुण्यात ‘मानाचे गणपती’ची प्राणप्रतिष्ठापना
पुणे: पुण्याच्या पाच मानाच्या गणपतींची ‘कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती आणि केसरी वाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
पुणे शहरात सकाळपासूनच सर्व रस्ते ढोल-ताशांच्या गजराने आणि पारंपारिक वाद्यांच्या आवाजाने दुमदुमून गेले होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात, फुलांनी सजवलेल्या रथातून मूर्ती मंडपात आणण्यात आली. यंदाच्या मंडपाचा देखावा वृंदावन येथील प्रसिद्ध ‘प्रेम मंदिर’वर आधारित आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळात, प्रसिद्ध बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली, तर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे विश्वस्त पुनीत बालन यांनी सांगितले की, यंदाची सजावट ही ‘श्री गणेश सुवर्णधाम’ या संकल्पनेवर आधारित असून त्यात गणपती बाप्पाच्या दिव्य धामाचे रूप दर्शवण्यात आले आहे. तसेच या मंडळाने पुण्याच्या गणेशोत्सवाचा वारसा महाराष्ट्राबाहेरही नेला असून, गेल्या आठवड्यात मानाच्या गणपतींच्या तीन मूर्ती काश्मीरमध्ये पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
केसरी वाड्याचे विश्वस्त रोहित टिळक यांनी सांगितले की, गणपतीच्या मूर्तीचे पारंपारिक वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. पुढील १० दिवस मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रम राबवले जातील. आम्ही विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या व्याख्यानांचेही आयोजन करत आहोत,’ असे टिळक म्हणाले.
शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था
गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावा यासाठी मुंबईत १६ हजार ८०० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच क्विक रिस्पॉन्स पथकांचाही समावेश आहे. गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवसांसाठीही विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दी आणि वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी संयम बाळगावा आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गणेश चतुर्थीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. दैवी आशीर्वादाने प्रत्येकाच्या प्रयत्नांना यश मिळावे आणि देशाची सातत्याने प्रगती होत राहावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. ‘विघ्नहर्त्या’ची पूजा करून त्याचे आशीर्वाद घेण्याच्या या पवित्र सणामुळे प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह निर्माण व्हावा, अशी आशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली. गणेश चतुर्थीच्या या मंगलमय पर्वानिमित्त माझ्या देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. दैवी आशीर्वादाने प्रत्येकाच्या प्रयत्नांना यश मिळावे आणि आपला देश सातत्याने प्रगती करत राहावा, अशी मी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया,” असे पंतप्रधान मोदी यांनी हिंदीत ‘एक्स’वरील संदेशात म्हटले.