गेटवे-मांडवा जलवाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; AIPA ची सुरक्षित जलवाहतुकीची मागणी प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

गेटवे-मांडवा जलवाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; AIPA ची सुरक्षित जलवाहतुकीची मागणी

गेटवे ऑफ इंडिया-मांडवा जलमार्गावर दरवर्षी सुमारे ३५ ते ४० लाख प्रवासी प्रवास करतात. पावसाळ्यातील खंडानंतर या मार्गावरील जलवाहतूक सेवा पुन्हा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Swapnil S

अलिबाग : गेटवे ऑफ इंडिया-मांडवा जलमार्गावर दरवर्षी सुमारे ३५ ते ४० लाख प्रवासी प्रवास करतात. पावसाळ्यातील खंडानंतर या मार्गावरील जलवाहतूक सेवा पुन्हा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मार्गावर धावणाऱ्या अनेक लाँचेस आणि फेरीबोटी ४० ते ५० वर्षे जुन्या असल्याने भर समुद्रात बिघाड होणे, भरकटणे तसेच अपघात होण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनने (एआयपीए) केला आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे सांगत अद्ययावत आणि सुरक्षित जलवाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी एआयपीएचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केली आहे.

मोकल यांच्या नेतृत्वाखालील एआयपीएच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगामुथु यांची मुंबईतील पोर्ट भवन येथे भेट घेतली. यावेळी मुंबई हार्बरमधील जलवाहतूक प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. या मागण्यांची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहिती एआयपीएने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून दिली आहे.

मुंबई आणि रायगडला जोडणारा गेटवे-मांडवा जलमार्ग पर्यटक आणि प्रवाशांसाठी सोयीचा ठरत आहे. मुंबईहून रायगडमध्ये येणारे लाखो पर्यटक या मार्गाचा वापर करतात. मात्र प्रवासी संख्या वाढत असताना जलवाहतूक सेवांमध्ये वारंवार भाडेवाढ होत असल्याचा आरोप एआयपीएने केला आहे. भाडेवाढीच्या तुलनेत प्रवाशांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याने प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

गेटवे ऑफ इंडिया येथील छोट्या जेट्टीवरून स्पीडबोट आणि यॉटद्वारे गेटवे-मांडवा प्रवासाची सेवाही उपलब्ध आहे. मात्र अवघ्या १५ मिनिटांच्या प्रवासासाठी मनमानी आणि अवाजवी भाडे आकारले जात असल्याचे एआयपीएने निदर्शनास आणले आहे. या भाड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य नियमावली करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

न्यू फेरी व्हार्फ येथे प्रवाशांसाठी मुंबई बंदर प्राधिकरणाच्या माध्यमातून बसविण्यात आलेले थंड पाण्याचे कूलर सध्या बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुविधा पुन्हा कार्यान्वित करावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.

शिष्टमंडळात चंद्रकांत मोकल यांच्यासह राजेंद्र जाधव, भारत आंबाडे, सचिन नागवेकर आदींचा समावेश होता. मुंबई बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी मागण्यांची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याने आगामी काळात गेटवे-मांडवा जलमार्गावरील प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि नियमनबद्ध सेवा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जुन्या लाँचेसचे सर्वेक्षण आवश्यक

गेटवे-मांडवा मार्गावर गेटवे जलवाहतूक सहकारी संस्थेमार्फत लाँचेस आणि फेरीबोटी चालविण्यात येतात. त्यापैकी अनेक जलवाहतूक साधने जुनी असल्याने त्यांचे सर्वेक्षण, तांत्रिक तपासणी आणि सुरक्षेच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मोकल यांनी सांगितले. मुंबई हार्बरमध्ये सुमारे ४०० जलवाहतूक साधने असल्याने त्यांच्या नियमित तपासणीला विशेष महत्त्व आहे. पूर्वी केंद्र सरकारच्या मर्कंटाईल मरीन विभागामार्फत प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जलवाहतूक साधनांचे सर्वेक्षण केले जात होते. त्याच धर्तीवर सध्याच्या साधनांचीही काटेकोर तपासणी करावी, अशी मागणी एआयपीएने केली आहे.

रो-रो सेवेसाठी एसओपीची मागणी

न्यू फेरी व्हार्फ अर्थात भाऊचा धक्का ते मांडवा या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून खासगीकरणातून रोल ऑन-रोल ऑफ (रो-रो) सेवा सुरू आहे. मात्र शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ केली जात असल्याने ही सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रो-रो सेवेसाठी शासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी मोकल यांनी केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पेढा, पनीरसह मिठाईही महागणार; दक्षिण मुंबईत म्हशीचे दूध ११२ रु. लिटर

देशभरात साखरेचे दर चढेच; किरकोळ बाजारात भाव ₹६० च्या पार, केंद्र सरकारने अनेक पावले उचलूनही साखर कडूच

मुंबई पोलिसांच्या घोडदळ पथकासाठी १.२७ कोटींचा निधी मंजूर; ३८ पोलिसांचे पथक तैनात, मुंबई पोलिसांचे बळ वाढणार

Mumbai : वाकोला नदीजवळच संरक्षक जाळ्या बसवणार; पालिका पावणेदोन कोटी खर्च करणार

Mumbai : नारळाच्या झाडांना संरक्षण जाळ्या बसवा! पालिका आयुक्त, उद्यान अधीक्षकांना मकरंद नार्वेकर यांचे पत्र