@CPRGuv/X
महाराष्ट्र

महाराष्ट्र जाणून घेण्यासाठी राज्यपालांचा पुढाकार, राज्यपालांचा जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संघटनांशी संवाद

राज्यपालांनी महाराष्ट्र जाणून घेण्याबाबतचा उल्लेख करत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या जिल्ह्यातील संस्कृती, त्या जिल्ह्यातील बलस्थाने, त्या जिल्ह्यातील समस्या जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे जाहीर केले आहे.

Swapnil S

जळगाव : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते दोन दिवस जळगाव येथे आले होते. यावेळी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी, विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधून जळगाव जिल्ह्यातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी राज्यपालांनी महाराष्ट्र जाणून घेण्याबाबतचा उल्लेख करत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या जिल्ह्यातील संस्कृती, त्या जिल्ह्यातील बलस्थाने, त्या जिल्ह्यातील समस्या जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे जाहीर केले आहे. राज्यपाल म्हणून सरकारला वेळोवेळी सल्ला देताना महाराष्ट्राच्या नसा समजून घेणे, मला गरजेचे वाटत असल्याचे स्पष्ट करत राज्याचा दौरा करत असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.

सोमवार आणि मंगळवारी राज्यपाल जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जळगावमधील वकील, डॉक्टर, शिक्षण, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, अभियंते, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे कलावंत, खेळाडू, अशासकीय सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, प्रसार माध्यम यांच्याबरोबर अनेक विषयांवर चर्चा केली. प्रत्येक क्षेत्रातील समस्या व मागण्या जाणून घेतल्या. तसेच स्थानिक विषयांबाबत त्यांनी प्रशासनास कार्यवाहीबाबत सूचना केल्या. जे विषय शासनस्तरावर आहेत, त्यासंदर्भात पाठपुरावा करू अशी ग्वाही देखील राज्यपालांनी यावेळी दिली.

या चर्चेमध्ये प्रामुख्याने महिलांची सुरक्षा, मुलींना स्वसुरक्षा विषयक प्रशिक्षण, शालेय विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी मुद्दामून प्रयत्न करण्याची गरज राज्यपालांनी अधोरेखित केली. याबरोबरच जिल्ह्यातील औद्योगिक वाढीसाठी जे अडथळे येतात ते दूर करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक प्रयत्न करावेत. प्लास्टिक इंडस्ट्रीज समोरच्या समस्या ऐकून त्याचा पाठपुरावा करण्याबरोबर जिल्ह्यातील सर्व उद्योग आणि व्यावसायिकांनी सोलार एनर्जीचा वापर करून सोलारसारख्या महत्त्वाच्या विषयाला प्रोत्साहन देण्याची गरज राज्यपालांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात क्रीडा संस्कृती वाढावी म्हणून प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त करून बास्केटबॉल सारख्या साधने उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभागाने प्रयत्न करावे असेही राज्यपालांनी सांगितले. अटल भूजल योजनेंतर्गत अधिकाधिक पावसाचे पाणी जमिनीत मुरेल यासाठी मेघा रिचार्ज करण्याबरोबर, पाण्याचा अपव्यय टाळून योग्य ते व्यवस्थापन होणे गरजेचे असल्याचे सांगून पाण्याचे तात्पुरते सोर्स निर्माण न करता ते अधिक टिकाऊ असण्यावर भर द्यावा, असे आवाहन ही राज्यपालांनी यावेळी बोलतांना केले.

जिल्ह्यातील अमृत प्रकल्प, कुसुम सोलार पंप योजना, जलजीवन मिशन, मनरेगा, आवास योजना, जिल्ह्यातील शाळा, आरोग्य योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सखी वन स्टॉप सेंटर, आहार योजना, पेसा, पी. एम. जनमन अभियान, अद्यावत वस्तू आणि सेवाकर, यासह जिल्ह्यातील विविध योजनांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी राज्यपालांच्या समोर सादरीकरणातून आढावा दिला. प्रारंभी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याच्या वतीने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिता वाघ, आ. शिरीष चौधरी, आ.सुरेश भोळे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपवन संरक्षक जमीर शेख, ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक आर. एस. लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. एम. तडवी, महाजनको प्रकल्प मुख्य अभियंता शशांक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर उपस्थित होते.

आदिवासींसाठी एकलव्य स्कूल स्थापणार

आदिवासींना वनपट्टे दिले आहेत, त्या वनपट्टेधारकांना सामान्य शेतकऱ्यांना जे लाभ दिले जातात ते लाभ मिळावेत, यासाठी राजभवनाकडून पाठपुरावा करण्यात येईल. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जळगावमध्ये एकलव्य स्कूलचा प्रस्ताव तयार करण्याचे सांगून आदिवासींच्या शाळांमध्ये अधिकाधिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी सीसीटीव्ही सारख्या आधुनिक माध्यमांचा वापर करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी दिली.

‘गोल्ड क्लस्टर’साठी प्रयत्न करावेत

जळगाव जिल्हा सोन्याच्या व्यवसायात अग्रेसर आहे. त्यासाठी 'गोल्ड क्लस्टर' करण्यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. जिल्ह्याच्या अविकसित भागाच्या विकासावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: जलसिंचन प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण करावे, जिथे तांत्रिक अडचणी असतील त्यातून मार्ग काढावा. राष्ट्रीय महामार्गाच्या १८ किलोमीटरचे रखडलेले काम स्पेशल केस म्हणून पूर्ण करावे. जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी विमान वाहतूक महत्त्वाची असून मुंबईसाठी दररोज विमान सुरू करण्याचा प्रयत्न करावा. तसेच इथल्या लोकांच्या मागणीप्रमाणे अहमदाबाद येथे विमान सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना यावेळी राज्यपालांनी केल्या.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी