उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना सरकारला वारंवार कोंडीत पकडणारे निलंबित वकील गुणरत्न सदावर्ते आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महापुरुषांच्या फोटोंसोबत महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याचा फोटो लावल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शेजारी नथुराम गोडसेचा फोटो झळकल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मात्र या सगळ्या घटनेनंतर आता सदावर्तेंनी नथुराम गोडसे याचा फोटो का लावला? यावर स्पष्टीकरण दिलं आहे. स्पष्टीकरण देतांना त्यांनी "नथुराम गोडसे यांच्यासोबत न्याय झाला नव्हता", असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
मला मत मांडण्याचा अधिकार आहे.
पुढे बोलतांना सदावर्ते म्हणालेत की, "जो फोटो दिसतोय तो नथुराम गोडसे यांचा आहे. मला या महाराष्ट्राला, देशाला, संघटनांना, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे की, मी वकील होतो आणि संविधानाचा अभ्यासक आहे. संविधानात डॉक्टरेट पदवी घेतलेला माणूस म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, नथुराम गोडसे यांच्यासोबत फाशीची ट्रायल झाली होती. गोडसे यांना न्यायाची वागणूक मिळाली नव्हती. म्हणुन मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे", असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
संविधानाचा अभ्यासक म्हणुन विचारायचं
महात्मा गांधी यांच्या मतांशी मी सहमत नाही, असं म्हणत गोडसे यांच्यावर अन्याय झालेला आहे. मी गोडसे यांचा फोटो आंबेडकर, शिवरायांसोबत लावलाय. मला संविधानाचा अभ्यासक म्हणुन विचारायचं आहे. नथुराम गोडसे यांची जी ट्रायल झाली होती. त्यामध्ये नथुराम यांच्यासोबत न्याय झाला नव्हता. नथुराम पळून गेले नाहीत. त्यांनी ट्रायल फेस केली. पण नथुराम यांना त्यावेळेस न्याय मिळाला नाही, अशी भूमिका गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली आहे.
सदावर्तेंचा मोर्चा पवार ठाकरेंकडे
यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदावर्ते यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "अहो शरद पवार, उत्तर द्या. माजी मुख्यमंत्री उत्तर द्या. तुमच्या समर्थन किंवा विरोध करण्याचं काहीच नाही. तुम्ही किती षंढ आहात हे तुम्हाला जनता दाखवेल. औरंग्याचं प्रेम तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. ही स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑपरेटिव्ह बँक शरद पवारांची आर्थिक नाडी आहे. पवारांमुळे एकदाही या कष्टकऱ्यांना अध्यक्षपद मिळालं नाही", असा दावा त्यांनी यावेळी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शिंदे सरकार आलं आणि शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकलेल्या लोकांना पुन्हा नोकरी मिळाली. तसंच शरद पवार यांना मिळालेल्या धमकीचा उल्लेख करत धमकी पवारांना मात्र मागणीसाठी कोण गेलं? तर त्यांची मुलगी. यांना कोण धमकी देणार? दाऊद इब्राहिम कोणाच्या काळात फुलला- फळला. असं ते म्हणाले आहेत. यावेळी येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये शरद पवार वैचारिक व्हायरस, त्यांच्या विचारांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी राज्यभर सभा आणि बैठका घेणार असल्याचं ते म्हणाले. यासाठी उद्यापासून रॅली देखील काढणार असल्याचं सदावर्ते यांनी यावेळी सांगितलं