पावसाचा रुद्रावतार! पुणे जलमय, तापीला महापूर; कोयनेतून मोठा विसर्ग 
महाराष्ट्र

पावसाचा रुद्रावतार! पुणे जलमय, तापीला महापूर; कोयनेतून मोठा विसर्ग

पुणे शहर आणि परिसरात शुक्रवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले, तर मुठा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे शहरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली.

Swapnil S

पुणे : पुणे शहर आणि परिसरात शुक्रवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले, तर मुठा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे शहरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली.

खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात होणारा पाण्याचा विसर्ग दुपारी ३ वाजेच्या सुमारास ३५ हजार क्युसेकवरून वाढवून ४३,५७१ ते ४५ हजार क्युसेक करण्यात आला. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील एकता नगर परिसराला सर्वाधिक फटका बसला. महानगरपालिकेने नदीकाठी उभारलेला मातीचा संरक्षण भराव दोन ठिकाणी फुटल्याने पुराचे पाणी वेगाने नागरी वस्त्यांमध्ये घुसले.

दरम्यान, पूरस्थितीमुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दरवर्षी पाहणी, पंचनामे आणि पूरसंरक्षण भिंतीची आश्वासने दिली जातात; मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला.

बोटींच्या सहाय्याने नागरिकांचे स्थलांतर

एकता नगरमधील द्वारका, जलपूजन आणि आनंद पार्क या सोसायट्यांसह अनेक ठिकाणी पाणी शिरले. सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये तब्बल १० ते १२ फूट पाणी साचल्याने शेकडो दुचाकी व चारचाकी वाहने पाण्याखाली गेली. तळमजल्यावरील घरे व दुकानेही जलमय झाल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शिवणे येथील भीमनगर परिसरातील काही घरांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना घडल्या.पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आणि अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. बोटींच्या साहाय्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. वयोवृद्ध आणि महिलांच्या स्थलांतरासाठीही बोटींचा वापर करण्यात आला.

खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले

धरणसाखळीतील खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांतील जलसाठाही ९० ते ९५ टक्क्यांहून अधिक झाला आहे. घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट, तर पुणे शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून विसर्ग ५० हजार क्युसेकपर्यंत वाढविण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. भिडे पूल पाण्याखाली गेल्याने नदीकाठच्या रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वंदे भारतमधून मानवी हृदयाचा 'प्रवास'; अवयव प्रत्यारोपणसाठी सुरत ते अहमदाबाद वाहतूक

NEET आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे; राज्याच्या गृहखात्याकडून आदेश जारी

मंत्री कार्यालय, निवासस्थानांसाठी वृत्तपत्र खरेदी बंदीचा निर्णय मागे; सामान्य प्रशासन विभागाचे शुद्धीपत्रक जारी

राज्यात अनेक भागांत जोरधार; नदी, नाले, धरणे ओव्हर फ्लो; हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा

हॉटेलची बदनामी थांबवा! हॉटेल व्यावसायिक संघटनेचे FDA ला आवाहन