मुंबईसह संपूर्ण कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने गुरुवारी जोरदार हजेरी लावत हाहाकार माजवला. पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराचा वेढा बसला असून, रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे शहरात २४ तासांत सुमारे १०० मिमी पावसाची नोंद झाली असून, झाडे पडणे, पाणी साचणे अशा घटनांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला, तर नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बदलापूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे वीज यंत्रणेला मोठा फटका बसला असून, हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. राज्यातील अनेक भागांत प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि बचाव पथके सतर्क करण्यात आली आहेत.
वादळी वाऱ्यांचा तडाखा; ३५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
बदलापूर : मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे बदलापूर शहरातील अनेक भागांमध्ये १५ ते २० झाडे विद्युत वाहिन्यांवर कोसळल्याने बुधवारी रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे सुमारे ३५ हजार ग्राहकांना रात्र अंधारात काढावी लागली. वीज नसल्याने पाण्याच्या मोटारी बंद पडून पाणीपुरवठाही विस्कळीत झाला.
महावितरणचे ७० ते ८० कर्मचारी रात्रभर दुरुस्तीच्या कामात गुंतले होते. गुरुवारी सकाळपर्यंत अनेक भागांत विजेचा लपंडाव सुरू असून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.
ठाण्यात २४ तासांत ९९.३२ मिमी पाऊस
ठाणे : शहरात बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरुवारी सकाळी साडेआठ या २४ तासांत ९९.३२ मिमी पावसाची नोंद झाली. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला असून पहाटे साडेतीनपर्यंतच्या एका तासात २१.५९ मिमी इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागांत झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र, कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही.
यंदाच्या पावसाळ्यातील एकूण पर्जन्यमान १,८९३.७८ मिमी इतके झाले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ते १,२७०.४८ मिमी होते.
गेल्या २४ तासांत आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे एकूण ६० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये झाडे पडण्याच्या २४, फांद्या पडण्याच्या १६, धोकादायक झाडांच्या ७, धोकादायक फांद्यांच्या २, धोकादायक इमारतीची १, पत्रे कोसळण्याच्या २, पाणी साचल्याची १ आणि इतर ७ तक्रारींचा समावेश आहे.
नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम; २४ तासांत १०० मिमी पावसाची नोंद, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, गेल्या २४ तासांत नाशिक शहरात तब्बल १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक पश्चिम भागात पावसाचा सर्वाधिक जोर कायम असल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी गंगापूर धरण ९० टक्के, तर दारणा धरण ८५ टक्के भरले असून, जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठा ६९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अखंड संततधार सुरू असल्याने जलसंपदा विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून गंगापूर आणि दारणा धरणांतून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत असून, सकाळी ८.०० वाजता ३,१६५ क्युसेक, ९.३० वाजता ४,२३६ क्युसेक आणि १०.३० वाजता ५,२९५ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला.
पावसाचा वेग आणि धरणातील वाढणारा जलसाठा लक्षात घेता पुढील काही तासांत विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरच्या डोंगराळ भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर, दारणा तसेच इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होत आहे.
प्रशासनाकडून आवाहन
भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांत नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. ग्रामीण भागातही नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून, प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली आहे.त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पालघरवर पावसाचा प्रलयकारी कहर; जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, जनजीवन विस्कळीत
पालघर: जिल्ह्यावर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने गुरुवारी प्रलयंकारी रूप धारण केले. डहाणू तालुक्यात अवघ्या २४ तासांत तब्बल १५ इंच पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या पावसाळ्यातील एकूण पर्जन्यमान ८१ इंचांवर पोहोचले आहे. धामणी धरणाचे दरवाजे उघडल्याने सूर्या नदीला पूर आला असून, मासवणसह अनेक भाग जलमय झाले आहेत. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी रेड व ऑरेंज अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी पालघर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख रस्ते, पूल आणि संपर्कमार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरुवातीला डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. धामणी धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर सूर्या नदी दुथडी भरून वाहू लागली. मासवण पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे मनोर-पालघर संपर्क तुटला. सफाळे-सातिवली, बायपास, झाई-बोर्डी-चिखली-घोलवड तसेच कासा-चारोटी मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
प्रशासनाचे आवाहन
जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ ते १० वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात मोठी पूरस्थिती किंवा जीवितहानीची अधिकृत नोंद झालेली नाही. मात्र, प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहेत. नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा, पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून जाण्याचा प्रयत्न करू नये आणि केवळ अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
८९१ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत डहाणू, तलासरी आणि पालघर तालुक्यातील पूरग्रस्त भागांतील २१८ कुटुंबांतील ८९१ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. स्थलांतरितांसाठी अन्न, पिण्याचे पाणी व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डहाणू तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
वाहतूक बंद
डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वाडा तालुक्यांतील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने किंवा दरडी कोसळल्याने वाहतूक बंद ठेवावी लागली. तलासरीतील सुतारपाडा परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. डहाणूतील आशागड, चरी, गंगाज, सागर नाका, इराणी रोड, कक्राडी पूल आणि डहाणू-कोसबाड मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. दरम्यान, घोलवड परिसरात रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने आणि भराव खचल्याने लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. उपनगरी लोकल सेवाही अनियमित झाली.