अहमदनगर : माझ्या भाषणांनी संतापून सरकारमधले, विरोधी पक्षातील सगळे बोलतात, तुम्ही राजीनामा द्या, हिंमत असेल तर राजीनामा द्या. माझ्या सरकारमधील नेतेही बोलतात. मला त्या सर्वांना विरोधी पक्ष, स्वपक्षातील, सरकारला सांगायचे आहे. १६ नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो. लाथ मारण्याची मला गरज नाही. अडीच महिने मी शांत राहिलो, याची वाच्यता नको असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी केला. मी शेवटपर्यंत ओबीसींसाठी लढणार, असेही भुजबळ म्हणाले.
अहमदनगरच्या ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ म्हणाले की, ३६० कोटी रुपये देऊन खोटा रेकॉर्ड केला जात आहे. नोंदीमध्ये खाडाखोड केली जात आहे. सगेसोयरे म्हणून खोटी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. हायकोर्टाचा निकाल आहे. त्यात न्यायाधीशांनी स्पष्ट म्हटलंय, सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली तर ओबीसींचे आरक्षण संपून जाईल, असे निकालात सांगितले आहे. खोटी वंशावळ जुळवण्याचे प्रकार वाढणार आहेत. खोटे प्रमाणपत्र देऊन कुणबी दाखले देण्याचे प्रकार माझ्या हाती आले आहेत. झुंडशाहीने असे कुणी आरक्षण घेतले तर त्याला कोर्टात आव्हान देता येईल, असे निकालपत्रात सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे, असे ते म्हणाले. मागासवर्गीय आयोगाचा सर्व्हे सुरू आहे, तो सगळा खोटा आहे. घरोघरी जाताहेत, १८० प्रश्न आहेत. एका घराला दीड तास लागतो. तपासणी करणारे कधी २५, कधी ५० घरांची तपासणी केली सांगून टाकतात. त्यात केवळ जात विचारली जाते, बाकी सगळे आपोआप भरले जाते. बंगला असला तरी झोपडी, घराबाहेर गाड्या असल्या तरी काहीच नाही सांगितले जाते. ३ न्यायाधीश बसले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशापेक्षा डबल पैसे घेतात. गुलाल उधळला, मग पुन्हा उपोषण कशाला, कोणासाठी, या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? असा घणाघातही मंत्री भुजबळ यांनी केला.
तसेच एक एक मागणी उपोषणकर्त्याकडून केली जाते. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर ओबीसीला मिळणाऱ्या सर्व सुविधा त्यांना द्यायच्या, मग त्या सुविधा ब्राह्मण, जैन, सर्व गोरगरीबांना देऊन टाका. ज्यादिवशी मागणी केली जाते त्यादिवशी जीआर काढला जातो. कोर्टाचे अनेक निकाल आले आहेत. परंतु तरीही राज्यात हे सर्व सुरू आहे. मग मराठा समाजाला ४० लाखांपर्यंत विना व्याज कर्ज दिले जाते, मग ते ओबीसी समाजालाही द्या, अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे. सर्वांनी ठरवलं तर एकत्र यायचे, तरच सर्वकाही होईल, असंही आवाहन छगन भुजबळांनी केले.
मला मराठा समाजाच्या नेत्यांची, विचारवंतांची कीव येते, हा तुमचा नेता कसा? जो बजेटमधून आरक्षण देता येते का बघा असे म्हणतो, कुणी बोलायला तयार नाही. कुणाच्या मागे जाताय? गावागावात दरी पडतेय, आम्ही आमच्या हक्काची लढाई लढतोय. मराठा समाजाला त्यांचे वेगळे आरक्षण द्या आणि आमच्यातून नको, असे बोलणे चूक आहे. ओबीसीतून आरक्षण घ्यायचे आणि मंडल आयोगालाच आव्हान देण्याची भाषा केली जाते. काय हुशार, दादागिरी करायची. तुम्ही सगळे एकत्रित राहा. एकावर अन्याय झाला तर सगळ्यांनी एकत्रित उभे राहिले पाहिजे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.
'मग सर्वेक्षण कशाला'? मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. पण एकनाथ शिंदे यांनी सांगितलं माझी शपथ पूर्ण झाली. तुमची शपथ पूर्ण झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे. तर मग सर्व्हेक्षण कशासाठी करत आहात? असा संतप्त सवाल करत छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला.