जालना : राज्यात आंदोलन करणारे ओबीसी आंदोलक आमचे विरोधकच नाहीत. लक्ष्मण हाकेंना छगन भुजबळ यांची फूस आहे. त्या आंदोलनाला भुजबळच सगळी रसद पुरवत आहेत. तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही केले तर नाव बदलेन, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना दिला आहे.
जरांगे-पाटील म्हणाले की, मी डिस्चार्ज घेतला होता, बीडला जाऊन आलो. पण, प्रकृती खराब झाली. त्यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल झालो. ओबीसींची चांगली मागणी आहे. त्यामुळे मराठा नेत्यांची डोळे उघडतील. ओबीसी नेते तुटून पडले आहेत. मराठ्यांच्या डोळ्यावर आलेली मस्ती आता उतरेल. भुजबळ अनेक दिवसांपासून मराठा नोंदी रद्द करा, असे म्हणतात. मंडल आयोगाने दिलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त दिलेले आरक्षण रद्द करा. मंडल आयोगाने दिलेले आरक्षणही रद्द करा. १६ टक्के आरक्षण तुम्ही कसे घेतले, आता दाखवतो. येवलावाल्याची नियत काय आहे हे समजले. मराठा नेत्यांनी भाकरी खाणे बंद करावे. हक्काच्या नोंदी रद्द करा, असे ते म्हणतात. मराठे नेत्यांनी आता तरी जागे व्हावे. मराठा कुणबी असल्याचे नोंदी सापडल्या तरी ते म्हणतात रद्द करा, अशी टीका त्यांनी भुजबळांवर केली.
ओबीसी लोकांचे वाटोळे मला करायचे नाही. जातीयवाद कसा असतो ते ओबीसी नेत्यांकडून पाहायला मिळत आहे. मराठा समाजाबद्दल यांची नियत काय आहे ते दिसत आहे. ओबीसी ७० वर्षांपासून बोगस आरक्षण खात आहेत. आज गरीब लोकांना मिळत आहे तर यांना वाईट वाटत आहे. त्यांचे विचार उघड पडले. लक्ष्मण हाके किती जातीयवादी आहेत हे कळले. हाकेंच्या मागणीवर ओबीसी नेते गप्प का? असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. आता मराठा नेत्यांवर टीका करणे कमी करा, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले.