महाराष्ट्र

बर्फाच्या दरात वाढ झाल्याने मच्छिमारांमध्ये नाराजी; दरवाढ न मानल्यास पुरवठा बंद करण्याचा इशारा

बर्फाच्या दरात वाढ केल्याने मच्छिमार संघटना आणि बर्फ उत्पादक यांच्यात तीव्र वाद निर्माण झाला आहे. ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशनने (All India Ice Manufacturer Association) बर्फाच्या किमतीत पुन्हा वाढ करण्याची मागणी केल्यामुळे मच्छिमारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Swapnil S

उरण : बर्फाच्या दरात वाढ केल्याने मच्छिमार संघटना आणि बर्फ उत्पादक यांच्यात तीव्र वाद निर्माण झाला आहे. ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशनने (All India Ice Manufacturer Association) बर्फाच्या किमतीत पुन्हा वाढ करण्याची मागणी केल्यामुळे मच्छिमारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकाच महिन्यात झालेली ही दुसरी दरवाढ असून, यामुळे मच्छिमारांची उपजीविका धोक्यात आली आहे.

१ ऑगस्ट रोजी बर्फाचा दर प्रति टन ८० रुपयांनी वाढवण्यात आला होता. आता बर्फ उत्पादक संघटना पुन्हा प्रति टन ८५ रुपयांची वाढ मागत आहेत. जर ही दरवाढ लागू झाली, तर बर्फाची किमत प्रति टन २,३०० रुपयांपर्यंत पोहचेल. वीज, मजुरी, मीठ आणि अमोनियाच्या वाढलेल्या खर्चाचे कारण देत ही दरवाढ आवश्यक असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे.

दरवाढीविरोधात मच्छिमार संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. वाढलेल्या बर्फ किमतीमुळे मासेमारीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढून त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होईल, असा त्यांचा दावा आहे.

बैठकीत दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वादावादी झाली. बर्फ उत्पादक संघटनेकडून सुरजित सिंग आणि रिझवान दोसानी उपस्थित होते, तर मच्छिमार संघटनांच्या वतीने प्रदीप नाखवा, रमेश नाखवा, के. एल. कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सध्या या वादावर कोणताही तोडगा निघालेला नसल्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये तणावाचे वातावरण आहे. बर्फाचा पुरवठा थांबवल्यास मासेमारी व्यवसाय ठप्प होण्याची भीती मच्छिमारांकडून व्यक्त केली जात आहे.

मच्छिमारांना आर्थिक फटका

करंजा मच्छिमार संघटनेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा वाद अधिकच तीव्र झाला. ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष सुरजित सिंग यांनी मच्छिमारांना थेट इशारा देत म्हटले, ही दरवाढ मान्य न केल्यास बोटींसाठी आणि मच्छिमार संघटनांसाठी बर्फाचा पुरवठा पूर्णपणे थांबवला जाईल. या निर्णयाचा परिणाम कुलाबा, भाऊचा धक्का आणि करंजा यांसारख्या प्रमुख बंदरांवरील मच्छिमारांवर मोठा होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कमी पाण्याची पिके घ्या; शेती खात्याचे शेतकऱ्यांना आवाहन

आसाममधील चहाच्या मळ्याचा ‘टी टुरिझम’वर भर; ग्राहकांना चहाच्या संस्कृतीशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न

‘गृह’ अन् ‘महसूल’ खाते कोणाकडे हे माहिती आहे का? परिवहन मंत्री सरनाईक यांचा आमदार मेहतांना टोला

मुंबईत गंभीर गुन्हेगारीत वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाच्या गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ

Navi Mumbai : एनआरआय फ्लेमिंगो तलावावर पर्यटकांची झुंबड; DPS, TSC वेटलँड्स पुनर्जीवित करा, पर्यावरणवाद्यांची राज्य सरकारकडे मागणी