महाराष्ट्र

रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपचाच मतदारसंघ; नारायण राणे यांचा दावा

“बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर त्यांचे रूद्राक्ष उद्धव ठाकरेंनी फेकून दिले. मातोश्रीतील सर्व गोष्टी मला माहिती आहेत. मात्र बाळासाहेबांनी माझ्याकडून वचन घेतले होते, म्हणून मी जास्त काही बोलत नाही,” असा इशाराही नारायण राणे यांनी दिला.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक लोकप्रतिनिधी भाजपचे आहेत. भाजपची संघटनात्मक ताकदही मोठी आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचाच आहे. जर पक्षाने संधी दिली तर रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून लोकसभा निवडणूक आपण लढवू, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही नेहमीप्रमाणेच जोरदार टीकास्त्र सोडले. “बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर त्यांचे रूद्राक्ष उद्धव ठाकरेंनी फेकून दिले. मातोश्रीतील सर्व गोष्टी मला माहिती आहेत. मात्र बाळासाहेबांनी माझ्याकडून वचन घेतले होते, म्हणून मी जास्त काही बोलत नाही,” असा इशाराही राणे यांनी दिला.

प्रदेश भाजप कार्यालयात नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते. राणे म्हणाले, “रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा आहे. सध्या येथे ठाकरे गटाचा खासदार असल्याने शिवसेना शिंदे गटाला त्यावर दावा करता येणार नाही. कोकणात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे तेथे आमचा हक्क आहे. मी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिलेला नाही. माध्यमांत काहीही बातम्या येत असल्या तरी पक्षाने मला संधी दिल्यास उमेदवारी स्वीकारणार आणि जिंकून येणार.”

मतदारच त्यांना तडीपार करतील

भ्रष्ट नेत्यांच्या अटकेविरोधात एकत्र येत दुखवटा साजरा करण्यासाठी रामलीला मैदानावर जमणाऱ्या सर्व भ्रष्ट नेत्यांना त्यांच्या पराभवाची गॅरंटी असल्यानेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली. अशा लायकी नसलेल्यांनी मोदी-शहा यांच्यावर बोलू नये, अन्यथा मतदारच निवडणुकीत तडीपार करतील, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला. तडीपार करण्याची भाषा उद्धव ठाकरेंनी करू नये. ज्यांनी कोरोना काळात पैसा खाल्ला, त्यांना आम्ही तडीपार करू. उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती बिघडली असल्याचेही राणे म्हणाले.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन