महाराष्ट्र

धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ! समाधानकारक पाऊस पडल्याने दिलासा

Swapnil S

उरण : मागील काही दिवसांपासून उरणमधील धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे रानसई धरण आणि पुनाडे धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. त्यामुळे उरणकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. रानसई धरणाची पातळी तीन फुटाने वाढली आहे, तर पुनाडे धरणात देखील ४ फुटांपर्यंत पाणी झाले आहे. रानसई धरणक्षेत्रात १३७ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. रानसई धरणाच्या पाणी पातळीत ३ फुटांची वाढ झाल्याने धरणातील पाण्याची पातळी ८८.१० फुटापर्यंत पोहचली आहे. काही दिवसांपूर्वी या धरणातील पाण्याची पातळी ८५.१० फूट या निचांकी पातळीवर गेली होती.

यावर्षी मोसमी पावसाचे आगमन वेळेपूर्वीच झाले आहे. त्यामुळे आनंद व्यक्त केला जात होता. मात्र जून महिना सरू लागला तरी धरणक्षेत्रात पाऊस न झाल्याने पाणीटंचाईची भीती व्यक्त करण्यात येत होती. मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार गुरुवारपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. उरणला पाणीपुरवठा करणारी पुनाडे व रानसई ही दोन्ही धरणे कोरडी पडू लागली होती. यातील पुनाडे धरण हे कोरडे पडले आहे तर रानसई धरणाची पातळी घटल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी धरणातील मृत साठ्यातील पाणी वापरले जात होते.

पुनाडे धरणात सध्या तीन-चार फूट पाणी वाढले आहे, मात्र पुन्हा पावसाने दडी मारल्यास हे पाणी पुरणार नाही. त्यामुळे नागरिकांना पूर्वीपेक्षा फक्त ४० टक्के पाणी देण्यात येते. येत्या तीन-चार दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास पुरेसा पाणीपुरवठा केला जाईल.

- अनामिका म्हात्रे (अध्यक्ष, दहा गाव पाणीपुरवठा योजना)

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला