आता क्लीनरशिवाय ट्रक धावणार! सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; ‘ड्रायव्हर असिस्ट सिस्टिम’ बंधनकारक, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे दंडाच्या जाचातून सुटका 
महाराष्ट्र

आता क्लीनरशिवाय ट्रक धावणार! सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; ‘ड्रायव्हर असिस्ट सिस्टिम’ बंधनकारक, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे दंडाच्या जाचातून सुटका

राज्यातील जड वाहन (एचएमव्ही) चालकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, वर्षानुवर्षे सुरू असलेली क्लीनरची अनिवार्य अट अखेर रद्द करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील जड वाहन (एचएमव्ही) चालकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, वर्षानुवर्षे सुरू असलेली क्लीनरची अनिवार्य अट अखेर रद्द करण्यात आली आहे. याऐवजी आता वाहनांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित पर्यायांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ‘मोटार वाहन कायदा, १९८८’ अंतर्गत ८ एप्रिल रोजी यासंदर्भातील राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले असून, यामुळे ट्रकचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘महाराष्ट्र मोटार वाहन (पहिली सुधारणा) नियम, २०२६’ नुसार, जर जड वाहनांमध्ये ‘ड्रायव्हर असिस्ट सिस्टिम’ बसवलेली असेल, तर क्लीनरची आवश्यकता भासणार नाही. या प्रणालीत ३६०-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग आणि ऑडिओ-व्हिज्युअल प्रॉक्सिमिटी अलर्ट यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश असणे आवश्यक आहे. आतापर्यंत क्लीनर नसल्यास दररोज १,५०० रुपये दंड आकारला जात असे. एकाच प्रवासात अनेकवेळा दंड भरवा लागत असल्याने ट्रान्सपोर्ट क्षेत्रातून यावर तीव्र टीका होत होती.

वाहतूक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला या निर्णयामुळे यश आले आहे. ‘ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस’चे (एआयएमटीसी) माजी अध्यक्ष आणि सल्लागार बाल मल्कित सिंग यांनी या निर्णयाचे स्वागत करताना हा वाहतूकदारांचा विजय असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे वाहतूकदारांची वार्षिक कोट्यवधी रुपयांची बचत होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, ओव्हरसाईज कार्गोसाठी वापरल्या जाणाऱ्या आर्टिक्युलेटेड सेमी-ट्रेलर आणि हायड्रोलिक ट्रेलरसाठी क्लीनरची अट अद्याप कायम ठेवण्यात आली आहे.

क्लीनरची गरज काय?

  • रिव्हर्स घेताना ट्रकचालकाला मागच्या बाजूचा अंदाज येत नाही. अशा वेळी क्लीनर खाली उतरून शिट्टी वाजवून किंवा हाताने इशारा करून रिव्हर्स घेण्यास मदत करतो.

  • प्रवासात टायर पंक्चर झाल्यास चाक बदलणे, इंजिनमध्ये पाणी किंवा ऑइल तपासणे आणि बॅटरीच्या कामात चालकाला मदत करणे.

  • मालाची सुरक्षा आणि देखरेख: ट्रकमधील मालाची चोरी होऊ नये म्हणून लक्ष ठेवणे, ताडपत्री बांधणे आदी कामे करतो.

  • कागदपत्रांची पूर्तता: टोल नाक्यावर पैसे भरणे, चेक पोस्टवर कागदपत्रे दाखवणे किंवा एन्ट्री करणे यांसारखी धावपळीची कामे क्लीनर करतो.

  • ड्रायव्हरला विश्रांती: लांब पल्ल्याच्या प्रवासात चालकाला झोप किंवा थकवा आल्यास क्लीनर गप्पा मारून त्यांना जागे ठेवण्यास मदत करतो.

भाजप सत्तेत आल्यास ६ महिन्यांत UCC लागू करू; पश्चिम बंगालमध्ये अमित शहा यांची घोषणा

मुंबई विमानतळावर २४ महिलांना ३७ कोटींच्या सोन्यासह अटक

Mumbai : भाड्याच्या परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

...अन् न्यायालयात कमावले; ३८ लाखांचा परतावा देण्याचे बँकेला न्यायालयाचे आदेश

बांधकामापूर्वीच ‘नवीन अनेक्स’मध्ये राज्यातील मंत्र्यांना दालनांचे वाटप; मुख्यमंत्री कार्यालयाला सात हजार चौरस फुटाची जागा