भास्कर जामकर/नांदेड
Indian Flag: खादी हे केवळ कापड नसून, तो एक राष्ट्रीय विचार आहे. याच विचारातून खादीपासून तयार केलेला राष्ट्रध्वज देशभरात फडकवला जातो. नांदेडमध्ये खादीपासून तयार केलेला राष्ट्रध्वज सोळा राज्यांमध्ये जातो, अशी माहिती मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे अध्यक्ष तथा माजी आ. ईश्वरराव भोसीकर यांनी 'नवशक्ति'शी बोलताना दिली. खादी ग्रामोद्योग मंडळाकडून हुबळी (कर्नाटक), दिल्ली, मुंबई आणि नांदेड़ या चार ठिकाणी राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते.
या ठिकाणांहून तयार झालेले राष्ट्रध्वज देशाच्या विविध राज्यांत पाठविले जातात. विशेष म्हणजे, नांदेडमध्ये तयार झालेला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावरही डौलाने फडकतो. नांदेडमध्ये विविध आकारातील राष्ट्रध्वज तयार केले जातात. सर्वात मोठा १४ बाय २१ फुट आकाराचा असतो. अन्य ध्वज ८ बाय २१ फूट, सहा बाय नऊ फूट, चार बाय नऊ फुट, तीन बाय साडेचार फूट, दोन बाय तीन फूट तसेच साडेसहा इंच बाय नऊ इंच आकाराचे बनविले जातात. मंत्रालयावर दररोज फडकणारा, मंत्र्यांच्या कारवर फडकणारा व राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी व इतर शासकीय कार्यालयांवर फडकणारा राष्ट्रध्वज हा खादी ग्रामोद्योग समितीत तयार केला जातो.
उदगीरमधून येते कापड
राष्ट्रध्वजाच्या निर्मितीचे केंद्र नांदेडमध्ये असून, सुमारे शंभर लोकांच्या हाताला काम मिळत आहे. उदगीर (जि. लातूर) येथून ध्वजाचे कापड आणून नांदेडमध्ये ध्वजाची निर्मिती केली जाते.
ध्वजनिर्मितीचे काम वर्षभर सुरू
नांदेडमध्ये खादी मंडळामध्ये सुमारे १०० च्या वर कारागीरांच्या हातून राष्ट्रध्वज निर्मिती होते. खादी ग्रामोद्योग मंडळाकडून २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, एक मे या महत्त्वाच्या दिवसांसाठी ध्वजनिर्मितीचे काम वर्षभर सुरू असते. यातून खादी समितीला दरवर्षी आठ ते नऊ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळते.
१९६७ मध्ये स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ, पद्मभूषण गोविंदभाई श्रॉफ यांनी स्थापन केलेल्या आणि नंतर शंकरराव चव्हाण यांनी पालनपोषण केलेले मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती केंद्र हे केवळ खादी उत्पादनांचे उत्पादन केंद्र नाही, तर भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते.- ईश्वरराव भोसीकर, अध्यक्ष (मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती, नांदेड)