मुंबई : एसटी महामंडळात अनेक प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबविण्यात येत असल्याने एसटीचे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. भाडेतत्त्वावर घेतल्या जाणाऱ्या १३१० गाड्यांच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या निर्णयाप्रमाणेच एसटीतील सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात येऊ घातलेल्या १ हजार ३१० भाडे तत्त्वावरील गाड्या, विजेवरील गाड्या, एल. एन. जी. वरील गाड्या, स्व मालकीच्या २ हजार ४७५ नवीन गाड्या हे सर्व प्रकल्प राबविण्यात मंत्रालयातून हस्तक्षेप झाला असून परिणामी एसटीचे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्या मुळे १३१० भाडे तत्वावरील गाड्या घेण्याच्या प्रक्रियेची चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने समर्थन केले आहे.
महामंडळामार्फत २ हजार ४७५ स्व मालकीच्या नवीन गाड्या घेण्याची घोषणा दोन वर्षापूर्वी करण्यात आली. पण अजून त्यातील एकही गाडी ताफ्यात दाखल झालेली नाही. त्यामुळे २ हजार ४७५ गाड्या घेण्याची फाईल मंत्रालयात कुणी आणि का प्रलंबित ठेवली याची चौकशी करावी, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे. तसेच एसटीत राबविल्या जाणाऱ्या सर्वच प्रकल्पांची चौकशी झाली पाहिजे. ते प्रकल्प राबविण्यात इतका उशीर का झाला? हे प्रकल्प राबवत असताना त्यात कुणाचा दबाव होता का? याचीही सखोल चाैकशी करण्यात आली पाहिजे असेही मागणी बरगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
ही फाइल वर्षभर मंत्रालयात पडून राहिली. या गाड्या घेण्यासाठी ९१२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली असताना सुद्धा तो निधी उपलब्ध करून देण्यात टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे साहजिकच वर्कऑर्डर देण्यास विलंब झाला व गाड्या वेळेवर येऊ शकल्या नाहीत. या गाड्या वेळेवर आल्या असत्या तर एसटीला दिवसाला येणारी दोन कोटी रुपयांची तूट भरून निघाली असती.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस , महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस