पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) नेते शरद पवार यांनी गुरुवारी पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या नेत्यांवर जोरदार टीका केली. 'सत्तेसाठी यांनी पक्ष फोडला, त्यांची ही कृती उचित नाही', असे शरद पवार म्हणाले.
आंबेगाव मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाने देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली असून त्यांची लढत विद्यमान आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्याशी होणार आहे. निकम यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत शरद पवार बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ मध्ये एकत्रित लढून ५४ जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतर आम्ही महाविकास आघाडीचे सरकार बनविले आणि जिल्ह्यातील दोन जणांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिले, असे दिलीप वळसे-पाटील आणि अजित पवार यांच्या संदर्भात शरद पवार म्हणाले.
या नेत्यांना ज्या पक्षाने सत्ता दिली आणि पक्षाला कार्यकर्त्यांमुळे यश मिळाले आणि त्यामुळेच हे नेते मंत्री झाले. मात्र काही सहकाऱ्यांना याचे विस्मरण झाले आणि त्यांनी ५४ पैकी ४४ आमदार पळविले आणि दुसऱ्या बाजूला जाऊन मिळाले. त्यामुळे राज्यात चुकीचे चित्र रंगविले गेले, त्यांना हवी असलेली सत्ता त्यांनी मिळविली. यापूर्वी त्यांना सत्ता मिळाली नव्हती असे नाही, परंतु पक्ष फोडून सत्ता मिळविणे उचित नाही, असे शरद पवार म्हणाले.
यावेळी शरद पवार यांनी आंबेगावचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्यावर टीका केली. आंबेगावची जनता वळसे-पाटील यांच्या निर्णयात सहभागी नव्हती, मात्र दुर्दैवाने लोकप्रतिनिधी सत्तेचा एक भाग झाला. त्यामुळे जनतेला धक्का बसला. कारण असे काही होईल याचा जनतेने विचारच केला नव्हता. आपण दिल्लीतील कामकाजामध्ये व्यस्त असल्याने राज्यातील काही नेत्यांवर जबाबदारी सोपविली होती, मात्र त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला, असे शरद पवार म्हणाले.
मविआच्या प्रचाराला ६ नोव्हेंबरपासून सुरुवात
विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या प्रचाराला ६ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते शरद पवार यांनी गुरुवारी येथे सांगितले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आपण स्वतः प्रचार करणार असल्याचे पवार म्हणाले.
१०-१२ जागांवर मविआचे दोन उमेदवार
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत त्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, केवळ १०-१२ जागांवर महाविकास आघाडीतील दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मात्र काही दिवसांत त्यावर आम्ही तोडगा काढू, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
जनतेचा पाठिंबा मिळविण्यासाठी आम्ही किमान समान कार्यक्रम जाहीर करणार आहोत. आपण स्वतः राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रचाराची सुरुवात केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.