जळगाव : जळगाव जिल्ह्यात शनिवारी (दि. १४) सकाळी अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. सकाळी सव्वानऊच्या सुमारास रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर, चोपडा आणि यावलसह अनेक भागांत जमिनीला हादरे बसले. अचानक घरातील वस्तू हलू लागल्याने अनेक नागरिकांनी सुरक्षिततेसाठी घराबाहेर धाव घेतली. या भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी नोंदवण्यात आली असून, त्याचा केंद्रबिंदू मध्य प्रदेशातील खरगोन परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.
सकाळी अचानक जमीन हादरली
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी नागरिक आपापल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना अचानक जमिनीला हादरे जाणवू लागले. काही घरांमधील वस्तू हलल्याने नागरिक घाबरले आणि घराबाहेर पडले. काही वेळातच भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती परिसरात पसरली. नागरिकांनी एकमेकांना फोन करून विचारपूस करण्यास सुरुवात केली.
जळगाव जिल्ह्यातील रावेर, चोपडा, यावल, भुसावळ आणि मुक्ताईनगर परिसरात भूकंपाचे हादरे जाणवले. तसेच मध्य प्रदेशातील खंडवा, बऱ्हाणपूर आणि सेंधवा परिसरातही जमीन हादरल्याची माहिती आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू कुठे होता?
समोर आलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू महाराष्ट्रात नसून मध्य प्रदेशातील खरगोन परिसरात होता. या भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी नोंदवण्यात आली असून, तो जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू महाराष्ट्राच्या सीमेजवळ असल्याने जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांतही त्याचे हादरे जाणवले.
हतनूर धरण परिसरालाही हादरे
या भूकंपाचे धक्के हतनूर धरण परिसरातही जाणवले. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी सुमारे ९.१५ वाजता धरण परिसरातील चौकीला दोन ते तीन सेकंद हादरे जाणवले. यावेळी चौकी हादरल्याचं तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं. मात्र, धरण परिसरातील भूकंप निरीक्षण यंत्रणा बंद असल्याने त्या ठिकाणी हादऱ्यांची नेमकी तीव्रता किती होती, हे समजू शकलेलं नाही. धरणाचं नुकसान झाल्याची कोणतीही पुष्टी झालेली नाही.
कुठे किती नुकसान झालं?
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर स्थानिक प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. विविध गावांमधून माहिती मागवण्यात आली असून, कुठे घरांचं किंवा इमारतींचं नुकसान झालं आहे का, याची पडताळणी केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत कोणत्याही भागातून जीवितहानी किंवा मोठ्या वित्तहानीचं वृत्त समोर आलेलं नाही. भुसावळच्या तहसीलदारांनीही परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
अडीच महिन्यांपूर्वीही जाणवले होते धक्के
विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात यापूर्वीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. सुमारे अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या त्या घटनेनंतर शनिवारी पुन्हा जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नुकसानाबाबतची अधिकृत माहिती संकलित केली जात आहे.