जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये सोमवारी रात्रीपासून आणि मंगळवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला. यामुळे नदी-नाले भरून पूर आला, काही गावांचा संपर्क तुटला आणि पिके, घरं तसेच जनावरांचे नुकसान झाले.
मुक्ताईनगर तालुक्यात पूराच्या पाण्यात किरण मधुकर सावळे (२८) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाने तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले असून, बाधित नागरिकांसाठी शाळांमध्ये निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथून ३५ अधिकारी व जवानांची पथके मागवली. त्यापैकी एक पथक जामनेर आणि दुसरे पाचोरा येथे रवाना करण्यात आले.
तापी नदीला पूर आला असून हतनूर धरणाचे १४ दरवाजे उघडले असून, ९० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना शांतता व संयम बाळगण्याचे आवाहन केले असून शासनाकडून आपत्तीग्रस्तांना मदत व नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये सोमवारी रात्रीपासून आणि मंगळवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. या अतिवृष्टीमुळे नदी-नाले भरून पूर आला, काही गावांचा संपर्क तुटला आणि पिके, घरे तसेच जनावरांचे मोठे नुकसान झाले. रविवारी आणि सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचे रेकॉर्ड पर्जन्य प्रमाण नोंदले गेले, ज्यामध्ये पैठण तालुका, जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, वडीगोद्री, तसेच कुंभारपिंपळगाव, तीर्थपुरी व अंतरवाली सर्कलचा समावेश आहे.
जिल्ह्यातील प्रमुख प्रभावित भाग
पाचोरा तालुका: पिंपळगाव, बरखेडी, शिंदाड, गहुले, वडगाव कडे, सातगाव डोंगरी, वाडी, शेवाळे व वाणेगाव याठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले. प्रशासनाने ३५०-४०० कुटुंबांना सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये स्थलांतरित केले. शिंदाड येथे तब्बल ४०० जनावरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मुक्ताईनगर तालुका: कऱ्हा व जोधनखेडा गावात घरांमध्ये पाणी शिरले असून पूरस्थिती आहे. काकोडा गावातील किरण मधुकर सावळे ( २८) हे दुर्दैवाने पुराच्या पाण्यात वाहून गेले. संबंधीत तालुक्यांचे प्रांताधिकारी, तहसीलदार, महसूल व कृषी खात्याचे अधिकारी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करत आहेत. बाधित कुटुंबांसाठी तातडीने अन्न, पिण्याचे पाणी व बिछायतची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
जामनेर तालुका: नेरी, जामनेर, वाकडी, शेंदुर्णी आणि तोंडापूर या गावांना पावसाचा फटका बसला. नेरी बु. येथे ३०–४० घरांमध्ये पाणी शिरले असून पशुधनाचे नुकसान झाले. नेरी दिगर येथे १५–२० घरांमध्ये व ५ दुकानांमध्ये पाणी साचले असून काही कुटुंबांना शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले. माळपिंप्री येथे पिकांचे मोठे नुकसान झाले असून सुनसगाव खुर्द व बु. या गावांचा संपर्क तुटला. खडकी नाल्यावरील पूलातून पाणी वाहत असल्याने जामनेर-जळगाव रस्ता बंद झाला असून वाहतूक ठप्प झाली.