जळगाव : नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीनंतर आता जळगाव महापौर व उपमहापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या निर्देशानुसार ६ फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौरांची निवड होणार आहे. मात्र उमेदवारांची नावे अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेली नाहीत.
जळगाव महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून, त्यानुसार भाजपचा महापौर आणि शिवसेना (शिंदे गट)चा उपमहापौर निवडला जाण्याची शक्यता आहे. अर्ज उचलण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपकडून महापौरपदासाठी सहा आणि उपमहापौरपदासाठी सहा असे एकूण बारा अर्ज उचलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
७५ सदस्यसंख्या असलेल्या जळगाव महापालिकेत महायुतीला ७० जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये भाजपला ४६, शिवसेना (शिंदे गट)ला २३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला १ जागा मिळाली आहे. या बलाबलावरून भाजपचा महापौर आणि शिवसेना (शिंदे गट)चा उपमहापौर होणे अपेक्षित मानले जात आहे. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महापालिका सभागृहात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत महापौर व उपमहापौर निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
२०१८ मध्ये प्रथमच निवडून आलेल्या महिलेला राजकीय दबावातून संधी देण्यात आल्याची पार्श्वभूमी लक्षात घेता यावेळी भाजप ज्येष्ठतेला प्राधान्य देणार की अन्य राजकीय समीकरणांना, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे. महापौरपदाच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उज्ज्वला बेंडाळे महापौरपदाच्या प्रमुख दावेदार ?
महायुतीच्या नेत्यांची अधिकृत बैठक अद्याप झालेली नसली तरी संभाव्य दावेदारांची नावे चर्चेत आहेत. भाजपमध्ये ज्येष्ठता आणि पक्षनिष्ठेला प्राधान्य दिले जाणार का, याबाबतही चर्चा रंगल्या आहेत. भाजपच्या उज्ज्वला मोहन बेंडाळे या तिसऱ्यांदा महापालिका सभागृहात निवडून आल्या असून त्यांनी महानगर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे. संघटनात्मक अनुभवाच्या बळावर त्या महापौरपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. तसेच दीपमाला मनोज काळे या देखील सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या असून त्यांच्या कुटुंबाचा गेली दोन दशके महापालिकेत प्रभाव राहिला आहे. त्या देखील शर्यतीत असल्याची चर्चा आहे.