निर्यात थांबली, मात्र ‘शामा’ची जादू कायम; जळगावच्या फटाक्यांना मध्यपूर्वेतूनही होती मागणी 
महाराष्ट्र

निर्यात थांबली, मात्र ‘शामा’ची जादू कायम; जळगावच्या फटाक्यांना मध्यपूर्वेतूनही होती मागणी

दिवाळी आणि फटाके यांचे अतूट नाते आहे. दिवाळी असो, लग्नसमारंभ असो किंवा अन्य कोणताही आनंदोत्सव, फटाक्यांच्या आतषबाजीशिवाय उत्सवाला पूर्णत्व येत नाही.

विजय पाठक

जळगाव : दिवाळी आणि फटाके यांचे अतूट नाते आहे. दिवाळी असो, लग्नसमारंभ असो किंवा अन्य कोणताही आनंदोत्सव, फटाक्यांच्या आतषबाजीशिवाय उत्सवाला पूर्णत्व येत नाही. जळगावकरांसाठी फटाके म्हटले की आजही ‘शामा फायर’ हे नाव आवर्जून घेतले जाते.

१९५० मध्ये जळगावात सुरू झालेल्या या फटाक्यांच्या कारखान्याची ख्याती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती, तर देशातील विविध राज्यांसह आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील देशांमध्येही शामा फायरच्या फटाक्यांना मोठी मागणी होती. याचा उल्लेख शासनाच्या गॅझेटमध्येही आढळतो. काळाच्या ओघात निर्यात थांबली असली, तरी जळगावकरांच्या मनातील या ब्रँडचे स्थान आजही कायम आहे.

भारतात प्राचीन काळापासून राजे-महाराजांच्या उत्सवांमध्ये दारूकाम आणि आतषबाजी केली जात असल्याचे संदर्भ आढळतात. मात्र, फटाक्यांची व्यावसायिक निर्मिती आणि विक्रीचे स्वरूप नंतर विकसित झाले.

चीनने फटाक्यांच्या व्यावसायिक विक्रीचे तंत्र विकसित केले आणि साधारण १९५० च्या दशकात भारतातही फटाक्यांचे उत्पादन व विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. जळगावमध्ये खान्देश मिलनंतर १९५० मध्ये सुरू झालेली शामा फायर वर्क्स ही फटाके निर्मिती करणारी महत्त्वाची कंपनी ठरली.

आज जळगावच्या जी. एस. मैदानावर फटाक्यांचे स्टॉल लागतात आणि अनेक विक्रेते उपलब्ध आहेत. तरीही शामा फायरकडे ग्राहकांची पावले वळतात. कारण हा केवळ फटाक्यांचा ब्रँड नसून जळगावकरांच्या दिवाळीच्या आठवणींशी जोडलेला एक भावनिक वारसा आहे. काळ बदलला, बाजारपेठ बदलली; मात्र ‘शामा फायर’च्या नावाची जादू आजही कायम आहे.

गॅझेटमध्ये कारखान्याच्या कामगारांची नोंद

शासनाच्या गॅझेटमधील माहितीनुसार, १९५३-५४ मध्ये शामा फायरच्या कारखान्यात ११० कामगार कार्यरत होते. १९५७-५८ मध्ये ही सरासरी संख्या १४० पर्यंत पोहोचली होती. त्या काळात कुशल कामगारांना दररोज सरासरी एक रुपया आठ आणे ते दोन रुपये वेतन मिळत असे. आजच्या काळात ही माहिती विशेष रंजक वाटते. मिलवाणी परिवाराने १९५० मध्ये जळगावात फटाक्यांचा कारखाना सुरू केला असला, तरी या कुटुंबाचा दारूकामाचा व्यवसाय १८३३ पासून सुरू होता. फाळणीपूर्वी हा परिवार आजच्या पाकिस्तानातील भागात दारूकामाचा व्यवसाय करत होता. फाळणीनंतर काही काळ फिरोजपूर येथे फटाके निर्मिती केल्यानंतर हा परिवार जळगावात स्थायिक झाला. आज या व्यवसायाची सातवी पिढी कार्यरत असल्याचे शामा फायरचे संचालक हरिश मिलवाणी सांगतात.

‘व्होल्कॅनो’ची होती विशेष क्रेझ

शामा फायरच्या फुलबाज्या, विविध प्रकारचे ॲटमबॉम्ब, आपटीबार आणि चिडी भुईचक्र यांना मोठी पसंती होती. ‘तुफान मेल’, ‘इंडियन तोफ’ आणि ‘व्होल्कॅनो’ या ब्रँडची विशेष लोकप्रियता होती. विशेषतः ‘व्होल्कॅनो’ ॲटमबॉम्बची मागणी प्रचंड होती. दिवाळीत किती व्होल्कॅनो फोडले, याची मुलांमध्ये कौतुकाने चर्चा व्हायची. जळगावसह मुंबई, मध्य प्रदेश, राजस्थान आणि पंजाबमध्येही या फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असे. आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील देशांमध्येही त्यांची निर्यात केली जात होती.

दुकानाबाहेर लागायच्या लांबच लांब रांगा

पूर्वी जळगावमध्ये फटाके विक्रीसाठी आजच्यासारखे मैदानावर स्टॉल लागत नसत. शामा फायरचे फटाके राजकमल टॉकीजशेजारील दुकानात मिळत असत. दिवाळीपूर्वी हे बॉक्स तुलनेने स्वस्त मिळत असल्याने खरेदीसाठी दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लागत. त्या काळात ‘चिडी’ हा फटाक्याचा प्रकारही लोकप्रिय होता. मात्र, पेटवल्यानंतर तो अनियंत्रित दिशेने उडत असल्याने कपड्यांमध्ये किंवा घरात शिरून काही जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या. अखेर शासनाने या प्रकारावर बंदी घातली.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आता दर ४ मिनिटे २५ सेकंदांनी मेट्रो; मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये वाढ

राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराजीचा स्फोट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तक्रारीचा सूर, देवगिरीवर आमदारांची बैठक

अनिल अंबानी समूहाप्रकरणी ED ची माेठी कारवाई; ५१० कोटींच्या संपत्तीवर टाच

Mumbai : नुकसानभरपाई मालक व भाडेकरूमध्ये समान वाटून घ्या! सिद्धिविनायक मंदिर जमीन भरपाईप्रकरणी आदेश

...तर निवडणुका घ्यायच्याच कशाला? 'गोकुळ' अध्यक्ष निवडीवरून सतेज पाटलांचा संताप