पुणे : 'भारत प्रतिभावान आणि बुद्धिमान देश आहे; मात्र गरीब कुटुंबातील मुलांसाठी शिक्षणाच्या संधी दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालल्या आहेत', अशी खंत ज्येष्ठ पटकथा लेखक-गीतकार जावेद अख्तर यांनी शनिवारी व्यक्त केली. गुरुकुल आणि मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणावरही त्यांनी टीका केली. 'अशा संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या मुलांच्या मनात विष भरलेले असेल', असा दावात्यांनी केला.
सामाजिक सुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते जावेद अख्तर यांना 'महात्मा फुले समता पुरस्कार २०२६' प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'सामान्य माणसाला संधी मिळाली, तर तो खूप काही साध्य करू शकतो; पण अनेकांना शिक्षणाच्या मूलभूत संधीही नाकारल्या जात आहेत. शिक्षण महाग झाले असून, ते केवळ एका विशिष्ट वर्गालाच परवडत आहे.
'सरकारी शाळा नसतील, तर रिक्षाचालकाच्या मुलाने कुठे शिकायचे? ज्या शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा खराब आहे, तिथे चांगले शिक्षक, योग्य व्यवस्था किंवा दर्जेदार अभ्यासक्रम नसतो. मदरसा किंवा गुरुकुलातून एखादे मूल बाहेर पडते, तेव्हा त्याच्या मनात विष भरलेले असते. आज हेच घडत आहे,' असा दावा अख्तर यांनी केला.
'शिक्षण देणे ही संविधानानुसार सरकारची जबाबदारी असल्याचे सांगत, ८० ते ८५ कोटी लोकांना अन्न पुरवण्याचा दावा करणारे सरकार त्याच संख्येतील लोकांना शिक्षण का देऊ शकत नाही', असा सवाल त्यांनी केला.
गुरुकुल-मदरशांच्या शिक्षणावर केली टीका
शिक्षण अन्नापेक्षा कमी महत्त्वाचे आहे का? पोट भरलेले असेल, पण डोके रिकामे राहील. डोके रिकामे का ठेवायचे ? दिवसातून दोन वेळचे जेवण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच शिक्षणही महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीला शिक्षित केले, तर त्याला दोन वेळच्या जेवणासाठी तुमच्याकडे मागणी करावी लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
परीक्षांमधील अनियमिततेविरोधात आवाज उठवणाऱ्यांना देशविरोधी ठरवण्याच्या प्रकारावरही त्यांनी टीका केली. 'तुम्हाला देशाची काळजी असेल, तर कुणी तुम्हाला देशविरोधी म्हटले तरी त्याची पर्वा करू नका. त्याला आणखी एक पद्मभूषण समजा,' असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.
औद्योगिक क्रांतीनंतर भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मागे पडला. जातीव्यवस्थेमुळे शारीरिक श्रम करणाऱ्या लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे गणितासारख्या क्षेत्रात प्रगती करूनही व्हॅक्यूम क्लीनर, वॉशिंग मशीन आणि ट्रॅक्टरसारख्या मूलभूत तंत्रज्ञानाचा विकास भारतात होऊ शकला नाही, असा दावा त्यांनी केला.
गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सरकारी शाळा बंद होत असल्याने शिक्षण पुन्हा एकदा विशेषाधिकार असलेल्या वर्गाच्या हातात जात असल्याची चिंता अख्तर यांनी व्यक्त केली.
लिमिटेशन आि आरक्षणाची सांगड कशासाठी?
महिला आरक्षणाला मतदारसंघ पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) प्रक्रियेशी जोडण्याच्या सरकारच्या हेतूवर जावेद अख्तर यांनी संशय उपस्थित केला. हे दोन्ही विषय स्वतंत्रपणे हाताळले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. युद्धाच्या वेळी महिला आणि मुलांना पुढे उभे केले जाते, जेणेकरून कोणी गोळीबार करू नये आणि मागून मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया आणली जाते, अशी ही बाब असल्याचे त्यांनी म्हटले.