'आकाशात असा निष्काळजीपणा'? VSR मालकांचा व्हिडीओ शेअर करत जय पवारांची कारवाईची मागणी; उड्डाणादरम्यान झोपल्याचा दावा 
महाराष्ट्र

'आकाशात असा निष्काळजीपणा'? VSR मालकांचा व्हिडीओ शेअर करत जय पवारांची कारवाईची मागणी; उड्डाणादरम्यान झोपल्याचा दावा

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर तपास प्रक्रियेवरून सुरू असलेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. त्यांचा पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर VSR मालक उड्डाणादरम्यान पायलट सीटवर झोपल्याचा दावा करणारा व्हिडीओ शेअर केला आणि DGCA कडे कठोर कारवाईची मागणी करत अपघात प्रकरणावर नवे प्रश्न उपस्थित केले.

Mayuri Gawade

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर तपास प्रक्रियेवरून सुरू असलेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. त्यांचा पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या व्हिडीओमध्ये VSR कंपनीचे मालक उड्डाणादरम्यान मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेल्या अवस्थेत दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘आकाशात असा निष्काळजीपणा असू शकतो का?’ असा सवाल उपस्थित करत जय पवार यांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

जय पवार यांनी व्हिडिओसह काय म्हटले?

जय पवार यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत अत्यंत भावनिक शब्दांत भूमिका मांडली आहे. वडिलांच्या निधनाची वेदना व्यक्त करत त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, "माझ्या वडिलांना आपण गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे."

ते पुढे म्हणाले, "मी DGCA ला ठामपणे मागणी करतो, या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे… माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी." या पोस्टमधून जय पवार यांनी केवळ भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली नसून, थेट नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (DGCA) कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये काय मागणी?

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा फोटो शेअर करत जय पवार यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये तपास प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी लिहिले - "DGCA ने ज्या मुद्द्यांवर VSR Ventures ची काही विमाने ग्राउंड केली आहेत, त्याच मुद्द्यांवर इतर विमानांमध्येही त्रुटी असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. जर सुरक्षेसंदर्भातील नियम आणि प्रक्रियांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असतील, तर केवळ काही विमानांपुरती कारवाई न करता संपूर्ण VSR फ्लीटबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, आवश्यक असल्यास VSR च्या संपूर्ण विमान ताफ्याचे पूर्णपणे संचालन बंद करण्याचाही DGCA ने विचार करण्यात यावा."

पुढच्या फोटोमध्ये त्यांनी लिहिले, "एएआयबीने तपासलेला प्राथमिक अहवाल मी वाचला. हा अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचे पाहून मला अत्यंत खेद आणि वेदना होत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला तसेच या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबीयांना केवळ औपचारिक माहिती नव्हे, तर सत्य, पारदर्शक आणि सर्वंकष उत्तरे मिळालीच पाहिजेत."

या दुसऱ्या पोस्टमधून जय पवार यांनी केवळ VSR कंपनीविरोधात कारवाईची मागणी केली नाही, तर तपास प्रक्रियेत पारदर्शकता आणि सखोल चौकशीचीही अपेक्षा व्यक्त केली आहे. अपघातात प्राण गमावलेल्या सर्वांच्या कुटुंबीयांना सत्य समोर यावे, हीच त्यांची प्रमुख मागणी असल्याचे या पोस्टमधून स्पष्ट होते.

"...आम्ही कदापि सोडणार नाही" - रोहित पवार यांचा संताप

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनीही जय पवार यांनी शेअर केलेला हाच व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या संदर्भात त्यांनी गंभीर आरोप करत लिहिले आहे - “हाच तो VSR कंपनीचा मालक रोहित सिंग… आज तो जणूकाय राज्यातील सगळ्याच मोठ्या नेत्यांपेक्षाही मोठा झालाय आणि याच्याच लग्नाला केंद्रातील मंत्रीपदावरील आणि राज्यातील सत्तेतील बडे नेते गेले होते… म्हणूनच त्याला वाचवण्याचा सगळीकडूनच प्रयत्न होताना दिसतोय.. विमान हवेत असताना स्वतः पायलट असूनही झोप काढतानाचा त्याचा माझे बंधू जय पवार यांनी शेअर केलेला हाच तो व्हिडिओ..! DGCA ची आजपर्यंतची संपूर्ण हालचाल बघता त्यांच्याकडून यावर कारवाई होईल की नाही, याबाबत आमच्या मनात शंका आहे. पण अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना मात्र आम्ही कदापि सो..ड…णा….र….. नाही."

रोहित पवार यांच्या या पोस्टमुळे प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढला असून तपास यंत्रणांच्या भूमिकेबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

Mumbai : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; परदेशातील भारतीयांसाठी दूतावासांच्या हेल्पलाइन सुरू

पाण्याचे फुगे, जबरदस्तीचा रंग… यंदा चालणार नाही! होळीपूर्वी मुंबई पोलिसांचा कडक इशारा; गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई

Navi Mumbai : धुलिवंदननिमित्त मेट्रोच्या वेळापत्रकात बदल; कधी बंद, कधी सुरू? जाणून घ्या माहिती

कुवैतमध्ये अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ल्याचा दावा; F-15 फायटर जेट कोसळले, Video

Iran vs Israel-US War : मध्यपूर्वेतील युद्धाचा महाराष्ट्राला फटका; विमानसेवा ठप्प, २०० पेक्षा जास्त प्रवासी दुबईत अडकले