बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची महायुतीशी जवळीक वाढत चालल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, मात्र त्याबाबत स्वत: जयंत पाटील यांनीच ‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका’, या केलेल्या विधानाबाबत खुलासा केला. ‘आपण नाराज नाही, आपल्याला बाहेर बोलण्याची चोरी झाली आहे’, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तत्पूर्वी, ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह पाटील यांनी कृषी विज्ञान केंद्राने एआय तंत्रज्ञान वापरून केलेली ऊस लागवड व अन्य प्रयोगांची पाहणी केली.
एकमेकांना इशारे देत नाही!
शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या नाराजीबद्दल सतर्क राहिले पाहिजे, असे विधान मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले होते. त्यावर जयंत पाटील म्हणाले, ‘आम्ही सर्व एका कुटुंबातील आहोत. आम्ही एकमेकांना इशारे देत बसत नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्ष आमचा आहे. आज आमचा पराभव झाला आहे. कदाचित निवडून आलेल्यांची संख्या कमी जरी असली तरी महाराष्ट्रात शरद पवार यांच्यासारखी, त्यांच्यावर प्रेम करणारे लाखो लोक आहेत, त्यांचा तो पक्ष आहे. आम्ही सर्वजण पक्षाच्या हिताचे निर्णय घेतो. एकट्याने इकडे जाणे, तिकडे जाणे हा विषय आम्ही कोणी चर्चेला घेऊ शकत नाही, असेही पाटील म्हणाले.
कृषी विज्ञान केंद्रात ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ या ठिकाणी आलेले आहे. त्यांच्यासोबत मी आलो. काही शास्त्रज्ञ देखील आलेले आहेत. बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठानमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर जे काम झालेले आहे, विशेषतः उसाच्या पिकावरती जे काम झालेले आहे, ते आश्चर्यकारक आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे काम महाराष्ट्रभर वाढवण्यासाठी मी येथे शिष्टमंडळासह आलो आहे, असेही ते म्हणाले.
जयंत पाटील यांच्याबाबत अंदाज व्यक्त करणे कठीण - एकनाथ शिंदे
दरम्यान, जयंत पाटील यांच्याबाबत अंदाज व्यक्त करणे कठीण आहे, आमचा रंग ज्यांना आवडेल त्यांनी सोबत यावे, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. विरोधी पक्षाचे संख्याबळ जरी कमी असले, विरोधी पक्षनेता बनण्याइतकेही संख्याबळ त्यांच्याकडे नसले तरी आम्ही विरोधकांना कमी लेखत नाही, असेही शिंदे म्हणाले. धूलिवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावर भाष्य केले.
जयंत पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी राजकारणात काम केले आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे की, चांगल्याला चांगले म्हणा. आम्ही सरकार म्हणून चांगले काम करत असू, तर चांगले म्हणा. जिथे चुकत असेल, तिथे नक्की सूचना करा. ज्यांना कुणाला वाटेल की, या भगव्या रंगात न्हाऊन निघावे, त्यांनी सोबत यावे, अशा सगळ्यांना शुभेच्छा आहेत, असेही शिंदे म्हणाले.
राष्ट्रवादी शरद पवार गटात लवकरच भूकंप - शिरसाट
राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाला रामराम करून लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. यापूर्वीही आपण हा दावा केला होता. शरद पवार यांच्या पक्षात लवकरच भूकंप होणार आहे, असे ते म्हणाले. आपले काहीच निश्चित नाही,असे विधान जयंत पाटील यांनी केले होते, त्या पार्श्वभूमीवर शिरसाट यांच्या दाव्याला विशेष महत्त्व दिले जात आहे.
माझ्या वक्तव्याचा संदर्भ लक्षात घ्या!
आपण जेथे वक्तव्य केले त्याचे संदर्भ पाहा, शक्तिपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आला होता , तेथे आपण सांगितले होते की, लोक कालांतराने नुकसानभरपाई घेतात आणि गप्प बसतात. त्यामुळे तुमचे सगळ्यांचे नक्की आहे का, तुम्ही हे शेवटपर्यंत नेणार आहात का, राजू शेट्टींनी झेंडा हातात घेतला असल्याने काळजीचे काही कारण नाही. खरे पाहता हा विनोदाचा भाग होता. राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही, आम्ही त्यांना उभे राहायला सांगितले होते. त्यामुळे माझे काही तुम्ही गृहीत धरू नका, खरे धरू नका, तुमचे आंदोलन सुरू ठेवा, त्याला आमचा पाठिंबा आहे, अशी त्यामागची भावना होती. मात्र, त्यावरून आपण नाराज आहोत, आपण पक्ष बदलणार आहोत, इथपर्यंत गाडी गेली, असे जयंत पाटील म्हणाले.