सांगली : आज ९६ रुपयाला मिळणारा अमेरिकन डॉलर महिन्याभरात १०० रुपयांवर जाईल. तर, महिनाभरात पेट्रोल १२० ते १३० रुपयावर जाईल, अशी धोक्याची घंटाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी वाजवली आहे. ईश्वरपूरमध्ये शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात जयंत पाटील बोलत होते.
ते म्हणाले की, कोरोनाच्या वेळी एकदा लॉकडाऊन झाला होता, आता आपोआपच लॉकडाऊन होईल अशी परिस्थिती आहे भविष्यातील अडचणी आणि धोके सांगितले आहेत.
ते म्हणाले की, देशाच्या गृहमंत्र्यांनी १५ दिवसापूर्वीच आपल्याकडे सहा महिने पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा साठा आहे, असं सांगितलं होतं. त्याला अजून महिना झाला नाही, तोवर देशाच्या पंतप्रधानानी खर्च कमी करण्याच्या सूचना देशवासियांना केल्या. अशाच पद्धतीची भूमिका २०१३ मध्ये आर्थिक परिस्थिती बिकट आल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतली होती. त्यावेळी आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे, अशा पद्धतीचा ट्विट केलं होतं. मात्र, तेच मुख्यमंत्री आज पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाची थट्टा करू नका, असे ट्विट करता आहेत, असे म्हणत जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही लक्ष्य केले.
पंतप्रधानांनी आपला ताफा दोन गाड्यावर आणला. मुख्यमंत्री दुचाकीवरून फिरायला लागलेत. याचं अनुकरण महाराष्ट्रातील सर्व मंत्री करतील आणि सर्व मंत्रिमंडळ दुचाकीवर येईल अशी अपेक्षा करूया, असेही जयंत पाटील म्हणाले. देशावर आर्थिक संकट आलं की पहिला शेतकरी, शेतमजूर भरडला जातो, त्यामुळे या संकटातून कसं बाहेर पडायचं यावर विचार करण्याची गरज आहे. आजच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी लोक रांगा करत आहेत, असे पाटील म्हणाले.