महाराष्ट्र

जेजुरी देवस्थान विश्वस्तपदाचा वाद चिघळला ; गावकऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

देवस्थानच्या रूढी, परंपरा तसेच यात्रांचे नियोजन हे ग्रामस्थांनाच पिढ्यान‌पिढ्या माहिती आहे. गावच्या बाहेरच्या व्यक्तीला याची माहिती नसते

नवशक्ती Web Desk

श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरीचा वाद आता चिघळत चालला आहे. गावातीलच स्थानिक विश्वस्त नेमण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत. जेजुरीकर ग्रामस्थांनी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांनी देखील ग्रामस्थांच्या मागणीला पाठिंबा दिला असून, या वादावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले आहे.

जेजुरीच्या श्री मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तपदाच्या नेमणुकीवरून वाद निर्माण झाला आहे. ७ पैकी ५ विश्वस्त हे जेजुरीच्या बाहेरचे आहेत. त्याला ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. या नेमणुकीविरोधात आंदोलन सुरू आहे. ग्रामस्थांनी उपोषणही सुरू केले असून, उपोषणाचा ९ वा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर जेजुरी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेतली. या वादावर तोडगा काढण्याची विनंती त्यांनी राज ठाकरेंना केली. १९७४ सालची देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची घटना आहे. त्यात दुरुस्ती करून यावर तोडगा काढता येऊ शकतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. खंडोबाच्या वर्षभरात ८ मोठ्या यात्रा असतात. ८ ते १० लाख नागरिक या यात्रांना भेट देत असतात. देवस्थानच्या रूढी, परंपरा तसेच यात्रांचे नियोजन हे ग्रामस्थांनाच पिढ्यान‌पिढ्या माहिती आहे. गावच्या बाहेरच्या व्यक्तीला याची माहिती नसते. विश्वस्तपदावर स्थानिक खांदेकरी मानकऱ्यांनाच संधी मिळाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.

७ पैकी ५ विश्वस्त बाहेरचे तसेच एकाच पक्षाचे आहेत. त्यामुळे स्थानिक विश्वस्तच हवेत, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. आता यावर तोडगा काढण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिल्याचे गावकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सांगितले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?