पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड येथील मुक्काम आटोपून जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ होत असताना एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, सात जण जखमी झाले आहेत.
सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीत पायी चालणाऱ्या वारकरी महिलांना ट्रकने जोरात धडक दिल्याने सांगलीतील तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या बाजूला सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या ‘हॉटेल शिपदीप लॉजिंग’समोर (भोंगळे मळा) हा अपघात घडला. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिशीकर यांच्या दिंडीतील ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला.
मृतांची नावे : नंदा पवार (वय ६०, कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली), माधवी राजाराम सालगरे (वय ५५, मालगाव, ता. मिरज, जि. सांगली), राजश्री शंकर भोसले (वय ५५, कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघींची नावे आहेत.
जखमींची नावे
निवृत्ती उमाजी जगताप, मंगल विलास पाटील, शैलजा दिनकर जगताप, नारायण महादू पडवळ, कासाबाई शंकर गस्ते रा.आष्ठा (सांगली), आक्काताई बबन कोळी, रा.शिरगाव (सांगली), गीताबाई सदाशिव हंकारे,रा. कसबेदिग्रज (सांगली) हे सात जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
जखमी महिलांना उपचारासाठी जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमींपैकी दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून ऊग्णालयात हलविण्यात आले आहे. याशिवाय, अन्य ५ किरकोळ जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी तातडीने आनंदी ट्रस्ट येथे दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. रविवारी माऊलींच्या पालखीचा सासवडमध्ये मुक्काम होता. सकाळी पालखी सोहळा सासवडहून जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. माऊलींच्या पालखीचा पहिला विसावा बोरावके मळा येथे असतो. त्यानुसार पालखी सोहळा मार्गक्रमण करत होता. पालखीपुढे अनेक दिंड्या, वारकरी तसेच भाविक होते.
प्राथमिक माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ पोखरबिशीकर यांच्या दिंडीतील एक ट्रक भरधाव वेगात जात होता. हा ट्रक पालखी सोहळ्यासाठी शिधा घेऊन जात होता. मात्र, यादरम्यानच चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट दिंडीत घुसले. या वाहनाने सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील पायी चालणाऱ्या वारकरी महिलांना जोरदार धडक दिली. त्यात तीन महिला वारकऱ्यांचा जागीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस, जिल्हा प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिकांनी व सहकाऱ्यांच्या सहाय्याने तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. त्यानंतर जखमींना ऊग्णालयात पोहोचवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
वारकरी महिलांचा करुण अंत; सोहळ्यावर दु:खाची छाया
पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून ७० वर्षीय ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन पालखी सोहळ्यात तीन वारकरी महिलांचा असा करूण अंत झाल्याने पालखी सोहळ्यावर दु:खाचे सावट पसरले आहे.
प्रशासकीय ढिसाळपणावर टीकेची झोड
या घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या नियोजनावर आणि ढिसाळ कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पालखी मार्गावर लाखो वारकरी चालत असताना आणि ४० ते ५० हजार वाहने दिंडी प्रमुखांसोबत जात असताना, वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी दिवे घाटात झालेल्या ६ तासांच्या वाहतूक कोंडीचा दाखला देत, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे.
वारीदरम्यान प्रत्येक मुक्कामस्थळी समाजआरतीनंतर दुसऱ्या दिवसाच्या मार्गक्रमणाबाबत वारकऱ्यांना सविस्तर सूचना देणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया असते. मात्र, रविवारी रात्री जेजुरीपर्यंतच्या प्रवासाबाबत वारकऱ्यांना कोणत्याही स्पष्ट सूचना देण्यात आल्या नाहीत. रस्ता दुतर्फा रुंद असल्याने वारकऱ्यांनी डिव्हायडरच्या डाव्या बाजूनेच चालावे आणि उजव्या बाजूचा रस्ता केवळ वारीतील वाहनांसाठी राखीव आहे, याबद्दलची माहिती वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात प्रशासन अपयशी ठरले. याच माहितीच्या अभावामुळे वारकरी गोंधळलेल्या स्थितीत दोन्ही बाजूंच्या लेनवरून प्रवास करत होते.
महामार्गावरील सुरक्षा यंत्रणेतही मोठी पोकळी दिसून आली आहे. मार्गावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग किंवा ध्वनिक्षेपकाद्वारे सातत्याने सूचना देणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीही प्रभावी यंत्रणा कार्यान्वित नव्हती. अनेक ठिकाणी वारकरी रस्ता प्रशस्त असल्याचा समज करून मुख्य मार्ग आणि सर्व्हिस रोडवरून वाट काढत होते, ज्यामुळे वाहनचालकांनाही मोठी कसरत करावी लागत होती. विशेषतः उड्डाणपुलावरून वेगाने उतरणाऱ्या वाहनांसमोर अचानक वारकरी येत असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली होती. अशा संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त किंवा स्वयंसेवकांची कमतरता होती.
जर पोलिसांनी वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका किंवा वेळेचे बंधन घातले असते, तर हा अपघात टाळता आला असता, अशी संतप्त भावना वारकरी आणि स्थानिकांनी व्यक्त केली. तसेच एका दिंडीसोबत सरासरी ५ ते ६ गाड्या असतात, मात्र या गाड्यांच्या वेगावर आणि हालचालींवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र दिसत आहे.
अपघातग्रस्त वारकऱ्यांची सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी उपचाराधीन वारकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या.
मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत - फडणवीस
पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ वारकऱ्यांना झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्यावतीने अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अपघाताच्या घटनेत वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेतील मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या अपघातातील जखमी वारकऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्वरित घटनास्थळी रवाना झाले असून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
तापाच्या गोळ्यांच्या ग्लानीतून चालकाकडून अपघात
ट्रकचालकाचे वय सुमारे ७० वर्षे होते. मुख्य म्हणजे हा चालक आजारी होता. त्याला ताप, कणकण व सर्दी होती. त्यामुळे त्याने तापाच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्याला ग्लानी आल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक संशय आहे.
पाठीमागून ट्रक आला आणि सगळं संपलं...
अपघातात जखमी झालेल्या एका महिला वारकऱ्याने थरकाप उडवणारा प्रसंग सांगितला. ‘आम्ही रस्त्याच्या कडेने चालत होतो. अचानक पाठीमागून मोठा ट्रक भरधाव वेगात आला. काही समजण्याआधीच त्याने अनेकांना धडक दिली. लोक एकामागोमाग एक खाली पडत गेले आणि ट्रक काहींच्या अंगावरूनच पुढे निघून गेला. सगळीकडे आरडाओरडा सुरू झाली. पण सगळं संपलं होतं.’ असे सांगताना या महिलेचा हुंदका दाटून आला.