पुणे : गेल्या काही आठवड्यांपासून जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर मंगळवारी रात्री शार्पशूटर्सनी गोळ्या घालून ठार केले. या बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये दोन अल्पवयीन मुले आणि एका वृद्धाचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि दहशत पसरली होती.
गेल्या महिन्यात जांबुत गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर रविवारी पिंपळखेड येथे १३ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी जाळली होती. या घटनांच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री शोधमोहीम राबवली. हल्ल्याच्या ठिकाणापासून सुमारे ४००-५०० मीटर अंतरावर बिबट्या दिसताच, त्याला भूल देऊन पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो आक्रमक झाला आणि पथकाजवळ येऊ लागला. अखेर रात्री साडेदहाच्या सुमारास शार्पशूटर्सनी त्याच्यावर गोळीबार केला, ज्यात तो ठार झाला. बिबट्याचे वय सुमारे पाच ते सहा वर्षे असल्याचे जुन्नर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बिबट्यांसाठी अनुकूल अधिवास
भारतीय वन्यजीव संस्थेच्या आकडेवारीनुसार, जुन्नर वन विभागात प्रत्येक १०० चौ.किमी. क्षेत्रात सुमारे ६ ते ७ बिबट्यांचे वास्तव्य आहे. परिसरातील ऊसशेती, फळबागा, पाण्याची उपलब्धता आणि पाळीव जनावरे यामुळे हा प्रदेश बिबट्यांसाठी अनुकूल अधिवास ठरला आहे. पिंपळखेड आणि जांबुत परिसरात सध्या बिबट्यांची दाट वस्ती असून, मागील दोन दिवसांत प्रत्येकी एक बिबट्या पकडण्यात आला आहे.
मानवी-वन्यजीव संघर्षावर वैज्ञानिक आणि मानवी दृष्टिकोनातून उपाय शोधण्याची गरज व्यक्त केली आहे. मानवी जीवांचे संरक्षण आवश्यक असले तरी वन्यजीवांचा नायनाट हा उपाय नाही. बिबट्यांच्या अधिवासात सुधारणा करून त्यांना योग्य निवास द्यावा. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.बी.एन. कुमार, संचालक नेट कनेक्ट फाउंडेशन