मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कुणाल कामरा प्रकरण गाजले असून याच मुद्द्यावरुन सत्ताधारी व विरोधक आमनेसामने उभे ठाकले होते. सभागृहात शेतकरी, माथाडी, बजेट विधेयक आदींवर विरोधक चर्चा करतील असे वाटले होते. परंतु त्यांच्या डोक्यात कबर व कामरा घुसलाय तर आम्ही तरी काय करणार, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
धनंजय मुंडे यांचा निर्णय कायद्याने घेतला असून कायद्यात तेच केले, अशी सारवासारव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सभागृहात सत्ताधारी असो वा विरोधी आमदार आपल्या मतदार संघातील प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे मांडत असतात. परंतु लक्षवेधी सूचनेच्या नावावर उलटसुलट काम होत असेल तर चालणार नाही. निकषांच्या आधारेच लक्षवेधी चर्चेला आल्या पाहिजेत, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
अनेकदा सभागृहात चर्चा सुरु असताना सदस्य बाहेर ये जा करतात. सह्या घेण्यासाठी येताच, याचा त्रास होतो यावर निर्बंध आणणार, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. सभागृहात भास्कर जाधव यांनी चांगले भाषण केले म्हणून चांगलेच म्हणणार. महाराष्ट्राची परंपरा आहे चांगले तर चांगलं म्हणायचे, सभागृहात अनेकदा विरोधी सदस्यांनी चांगलं भाषण केले तर चिठ्ठी पाठवत अभिनंदन केले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
टेस्ट मॅच असली तरी ट्वेंटी-ट्वेंटी सारखेच खेळणार - एकनाथ शिंदे
महायुतीचे सरकार घटनाबाह्य सरकार नसून २३५ आमदारांचे सरकार आहे. पाच वर्षांची टेस्ट मॅच असली तरी महायुती म्हणून २० - २० मॅच खेळणार. प्रिटींग मिस्टेक वगैरे काही बोलणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. दावोसमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणावर येत आहे. उद्योजकांना जागा उपलब्ध करुन देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आता राज्याच्या विकासाचा गाडा आता थांबणार नाही, असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले. विरोधकांची संख्या कमी असली तरी आम्ही त्यांना कमी लेखत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न अन्य प्रश्नांना त्यांनी सभागृहात येऊन वाचा फोडणे अपेक्षित होते. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याची आमची तयारी होती, परंतु विधी मंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात त्यांनी धन्यता मानली. काही जण आरोपाची जुनी टेप वाजवत पायऱ्यावरुन घुमजाव करत होते, असे शिंदे म्हणाले.