कराड : सांगली जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या सीमेवरील कडेगाव येथे मोहरमनिमित्त गगनचुंबी ताबूतांच्या पारंपरिक भेटींचा दिमाखदार सोहळा शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या य सोहळ्याला महाराष्ट्रासह कर्नाटकातून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील भाविकांची मोठी गर्दी झाली होती. कडेगावमध्ये गेल्या सुमारे दीडशे वर्षांपासून मोहरम उत्सवानिमित्त हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली जात आहे.
यंदाही ही परंपरा मोठ्या उत्साहात कायम राखण्यात आली. विधिवत पूजनानंतर सकाळी ११ वाजता मानाचा 'सातभाई' ताबूत उचलण्यात आला आणि ताबूत भेटीच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. यानंतर देशपांडे, हकीम, शेटे, बागवान, अत्तार, पाटील आदी मानाचे उंच ताबूत ठरलेल्या क्रमाने पाटील चौकात आणण्यात आले.
'या हुसेन', 'हक हुसेन', 'इमाम हुसेन झिंदाबाद', 'मौला अली झिंदाबाद' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. जोरदार वारा आणि रिमझिम पावसात उंच ताबूतांच्या भेटींचे मनोहारी दृश्य पाहून भाविक भारावून गेले. त्यानंतर सर्व ताबूत पारंपरिक मानक्रमानुसार सुरेशबाबा देशमुख चौकात एकत्र आले. येथे मेलवाल्यांनी 'महान भारत देश आमुचा', 'प्यारा-प्यारा हमारा देश प्यारा' तसेच 'हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकी से सागर पार करेंगे' यांसारखी राष्ट्रीय एकात्मतेची गीते सादर करून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. त्यानंतर मसूद माता ताबूत पंजे, बारा इमाम पंजे आणि अन्य मानाचे ताबूत सहभागी झाल्यानंतर मुख्य भेटीचा सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. दुपारी चार वाजेपर्यंत सर्व ताबूत आपापल्या ठिकाणी परतले.
१४ मानाचे ताबूत
कडेगावच्या मोहरमची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या सोहळ्यात सहभागी होणारे १४ मानाचे ताबूत. यामध्ये हिंदू समाजाचे सात आणि मुस्लिम समाजाचे सात ताबूत सहभागी होतात. गेल्या दीडशे वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू असून, धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा हा सोहळा राज्यभरात विशेष ओळख निर्माण करून आहे. मात्र नगराध्यक्ष तथा मोहरम मानकरी धनंजय देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे संपूर्ण मोहरम मार्गाचे भूमिगत गटार आणि काँक्रीटीकरण करण्यात आल्याने यंदा ताबूत मिरवणूक अधिक सुकर झाली.