कराड : ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली दुचाकीवर पलटी झाल्याने झालेल्या भीषण अपघातात आईचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. सुदैवाने दुचाकीवरील सून वेळीच बाजूला पळाल्याने बचावली. गुरुवारी सकाळी सुमारे दहाच्या सुमारास पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील ढेबेवाडी फाटा, आगाशिवनगर येथील कोणार्क पार्कसमोर ही घटना घडली.
मालन मोहन सुतार (६०) असे मृत महिलेचे नाव असून, यशवंत मोहन सुतार ( २८) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक युवराज पवार (२१) याच्याविरुद्ध कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चचेगाव येथून ऊस घेऊन कृष्णा कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टरसमोर अचानक दुचाकी आल्याने चालकाने ब्रेक मारला. त्यामुळे मागील ट्रॉलीचा तोल जाऊन ती सुतार कुटुंबाच्या दुचाकीवर पलटी झाली. नागरिकांनी तातडीने मदतकार्य करून दोघांना बाहेर काढले.
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर विस्कळित झाली. दरम्यान, कोणार्क पार्कजवळील रस्त्यालगतच्या फटाक्यांच्या स्टॉलमुळेही अपघाताचा धोका असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.