Satara : कराडजवळ स्वीट कॉर्न मक्याच्या पिकाची चोरी; दुष्काळात शेतकऱ्याला आर्थिक फटका, परिसरात भीतीचे वातावरण 
महाराष्ट्र

Satara : कराडजवळ स्वीट कॉर्न मक्याच्या पिकाची चोरी; दुष्काळात शेतकऱ्याला आर्थिक फटका, परिसरात भीतीचे वातावरण

वाढते ऊन, खालावत चाललेली पाण्याची पातळी आणि जनावरांच्या चारा-वैरणीची टंचाई अशा दुष्काळी परिस्थितीतही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

Swapnil S

कराड : वाढते ऊन, खालावत चाललेली पाण्याची पातळी आणि जनावरांच्या चारा-वैरणीची टंचाई अशा दुष्काळी परिस्थितीतही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र, आता शेतातील उभ्या पिकांचीच चोरी होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कराड तालुक्याच्या पूर्वेकडील शामगाव येथे शेतकरी संजय पोळ यांच्या सुमारे एक एकर क्षेत्रातील स्वीट कॉर्न मक्याचे पीक चोरट्यांनी टेम्पो लावून कणसांसह कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऐन दुष्काळात पाणी देऊन जिवापाड जपलेल्या पिकाची चोरी झाल्याने पोळ यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

शामगाव येथील संजय पोळ यांचे पुसेसावळी-कराड रस्त्यालगत ‘इनाम’ नावाचे शेतशिवार आहे. त्यांनी जनावरांसाठी वैरण आणि मक्याच्या कणसांची विक्री करण्याच्या उद्देशाने सुमारे एक एकर क्षेत्रावर स्वीट कॉर्न मक्याची लागवड केली होती. पाणीटंचाई असतानाही त्यांनी कष्टाने हे पीक जगवले होते. सध्या मक्याच्या कणसांना चांगली मागणी असल्याने त्यातून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती.

मात्र, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी टेम्पो आणून मक्याच्या कणसांसह सुमारे एक एकर क्षेत्रावरील पीक कापून नेल्याचे समोर आले. दुष्काळात पिकासाठी केलेला खर्च आणि घेतलेले कष्ट वाया गेल्याने पोळ यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, संजय पोळ यांनी याप्रकरणी मसूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

घरफोड्यांनंतर उभ्या पिकावर डल्ला

गेल्या आठवड्यात शामगाव परिसरातील राजेचे कुर्ले गावात आठ ते दहा घरफोड्या करून चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ग्रामस्थांनी मसूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता शेतातील उभ्या पिकाची चोरी झाल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकरी अधिकच भयभीत झाले आहेत. शेतातील पीकही सुरक्षित राहिले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

(इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

‘इंडिया’ आघाडीचा आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा; राहुल गांधींनी दिली माहिती

Mumbai : राडारोडा टाकला तर 'दंड'; आजपासून कारवाईचा बडगा, नोंदणी आणि वाहनांवर ट्रॅकिंग यंत्रणा बंधनकारक

Delhi Protest : शांततापूर्ण आंदोलनांवर कारवाई नको; सर्वोच्च न्यायालयाची तंबी, मेट्रो, इंटरनेट सेवा पूर्ववत करा

नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे घरे, पूल वाहून गेले; ८० हून अधिक जणांची सुटका, ५ बेपत्ता, Video

CJP Protest : आंदोलन होणार तीव्र; झुरळांचा इशारा, ‘इंडिया’ आघाडीसह सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन