Karjat : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी; मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात कलाकार मग्न 
महाराष्ट्र

Karjat : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी; मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात कलाकार मग्न

गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने कर्जत तालुक्यात गणेशोत्सवाची लगबग वाढली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतींच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, गणेशमूर्ती साकारणारे कलाकार बाप्पाच्या मूर्तीला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत. मूर्तीवर रंगकाम, डोळ्यांची आखणी, वस्त्रालंकार आणि सजावटीची कामे वेगाने सुरू आहेत.

प्रतिनिधी

विजय मांडे/कर्जत

गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने कर्जत तालुक्यात गणेशोत्सवाची लगबग वाढली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतींच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, गणेशमूर्ती साकारणारे कलाकार बाप्पाच्या मूर्तीला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत. मूर्तीवर रंगकाम, डोळ्यांची आखणी, वस्त्रालंकार आणि सजावटीची कामे वेगाने सुरू आहेत.

दरम्यान, सार्वजनिक गणेश मंडळांनीही उत्सवाची तयारी जोरात सुरू केली आहे. मंडप उभारणी, विद्युत रोषणाई, आकर्षक देखावे, फुलांची सजावट आणि विविध प्रकारच्या सजावटीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. घराघरांतही गणरायाच्या स्वागतासाठी स्वच्छता आणि सजावटीची तयारी सुरू झाली आहे.

कर्जत परिसरातील ज्येष्ठ मूर्तिकार चंद्रकांत वरसोलीकर (कोळी) हे गेल्या सुमारे ५० ते ५५ वर्षांपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे काम करीत आहेत.

वयाची ऐंशी वर्षे पार केल्यानंतरही त्यांचा उत्साह कायम असून, ते स्वतः मूर्ती रंगविण्याबरोबरच बाप्पाच्या डोळ्यांची आखणीही करतात. त्यांच्या या व्यवसायात त्यांची दोन्ही मुले, सून आणि नातूही मदत करतात. गणेशमूर्तींना धोतर, शेला, दागिने आणि अन्य अलंकार लावण्याचे कामही वरसोलीकर कुटुंबीयांकडून केले जाते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दिवसांत त्यांच्या कारखान्यात विशेष लगबग पाहायला मिळते.

‘चंद्रकांत पेंटर’ म्हणून वेगळी ओळख

कर्जतकरांमध्ये चंद्रकांत वरसोलीकर यांची ओळख ‘चंद्रकांत पेंटर’ म्हणूनही आहे. सुमारे सहा दशकांपूर्वी त्यांनी साईन बोर्ड रंगविण्यापासून आपल्या कलेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांचे अक्षरलेखन इतके सुबक होते की, हाताने रंगविलेला फलक पाहून तो छापील असल्याचा भास व्हायचा. त्या काळात कपड्यांवर बॅनर तयार करणे, चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांच्या जाहिराती रंगविणे आणि विविध प्रकारचे फलक तयार करण्याचे काम त्यांनी केले. पुढे त्यांनी गणेशमूर्ती साकारण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली आणि आजही त्यांची ही कलासाधना सुरू आहे. कर्जत परिसरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती त्यांच्या कारखान्यात तयार झालेल्या आहेत. अनेक दशकांची परंपरा, अनुभव आणि कलेचा वारसा जपत वरसोलीकर कुटुंबीय आजही गणरायाच्या मूर्तींना आकार देत आहेत. गणेशोत्सव जवळ येत असताना कर्जत परिसरात बाप्पाच्या आगमनाची चाहूल अधिकच भक्तिमय झाली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मंडपांना थर्ड पार्टी ऑडिट बंधनकारक; प्रति खड्डा दोन हजार दंड वसुली, BMC चा इशारा

नोकरी गेल्यास अमेरिकेतून बाहेर; ६० दिवसांचा सवलतीचा कालावधी रद्द करण्याची तयारी, ट्रम्प प्रशासनाचा H-1B व्हिसाबाबत कठोर पवित्रा

NSS विद्यार्थ्यांची 'निर्माल्य मुक्ती' मोहीम; प्लास्टिक-थर्माकोल वेगळे करून खताची निर्मिती

पुण्यातील १० दिवसांची दारूबंदी रद्द; उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर निर्णय मागे, गणेशोत्सवात केवळ दोनच दिवस निर्बंध

‘सर्वच न्यायालये बहुसंख्याकवादाकडे’; SC चे निवृत्त न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी व्यक्त केली चिंता