कर्जत : कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्पाला विरोध दर्शवत भाजपचे माजी रायगड जिल्हा युवा मोर्चा कोषाध्यक्ष आणि कर्जत तालुका चिटणीस मिनेश भगवान मसणे यांनी पक्षाच्या पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी युवा प्रदेश महासचिव ऋषिकेश जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर मसणे यांच्या निर्णयामुळे कर्जत तालुक्यात भाजपमधील राजीनाम्यांची चर्चा सुरू झाली आहे.
कर्जत तालुक्यातील साय डोंगर-१ परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र बाधित होण्याची आणि वृक्षतोड होण्याची शक्यता असल्याची चिंता मसणे यांनी राजीनामा पत्रात व्यक्त केली आहे. या प्रकल्पामुळे सह्याद्रीची वनसंपदा आणि स्थानिक नागरिकांच्या हिताला धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
विकासाच्या नावाखाली सह्याद्रीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत असेल, तर त्याविरोधात आवाज उठवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पक्षात राहून सरकारच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करणे आपल्याला मान्य नसल्याचे सांगत, पर्यावरण आणि भावी पिढ्यांच्या हितासाठी स्वतंत्रपणे भूमिका मांडता यावी म्हणून राजीनामा देत असल्याचे मसणे यांनी स्पष्ट केले.