टोरंट प्रकल्पावरून महायुतीत दिवाळीचे फटाके; अनिकेत तटकरेंनी राजीनामा द्यावा; थोरवेंचे आव्हान 
महाराष्ट्र

टोरंट प्रकल्पावरून महायुतीत दिवाळीचे फटाके; अनिकेत तटकरेंनी राजीनामा द्यावा; थोरवेंचे आव्हान

कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्पावरून रायगडमध्ये महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळला आहे.

Swapnil S

कर्जत : कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्पावरून रायगडमध्ये महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळला आहे. आमदार अनिकेत तटकरे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या भूमिकेवर टीका केल्यानंतर थोरवे यांनीही आक्रमक प्रत्युत्तर देत त्यांना राजीनामा देण्याचे आव्हान दिले.

३ नोव्हेंबर रोजी पोसरी येथील शिवतीर्थावर आयोजित पत्रकार परिषदेत थोरवे यांनी, राजकारण करण्याची एवढीच हिंमत असेल, तर राजीनामा द्या. माझ्या मुलाला तुमच्यासमोर उभे करतो. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या, असे आव्हान तटकरे यांना दिले. आपण राजकीय परिस्थितीनुसार भूमिका घेतो, कोणाच्या दबावाखाली नाही, असे सांगत त्यांनी तटकरे यांच्यावर टीका केली.

विधान परिषद निवडणुकीच्या वेळी पक्षाचा आदेश पाळून सहकार्य केले; मात्र काम झाल्यानंतर आपल्याच पाठीत वार करण्यात आल्याचा आरोप थोरवे यांनी केला. अनिकेत तटकरे यांच्या निवडीसाठी महायुतीतील आमदारांनी सहकार्य केले होते, असेही त्यांनी नमूद केले. याआधी अनिकेत तटकरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील थोरवे यांच्या भूमिकेचा संदर्भ देत, सुनील तटकरे यांच्याबाबतची भूमिका अचानक कशी बदलली, असा सवाल उपस्थित केला होता.

कर्जत-खालापूर परिसरातील प्रस्तावित टोरंट प्रकल्पाच्या समर्थन-विरोधावरून हा वाद अधिक तीव्र झाला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी प्रकल्पाला विरोधाची भूमिका घेतली असताना, थोरवे यांनी हा प्रकल्प राज्य सरकारच्या धोरणाचा भाग असल्याचे सांगत विरोधकांनी आधी सत्तेतून बाहेर पडावे, अशी भूमिका मांडली आहे. प्रकल्पाबाबतच्या भूमिकेवरून त्यांनी सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वावरही टीका केली.

विकास आणि ‘सेटलमेंट’च्या आरोपांची चर्चा

मतदारसंघाच्या शाश्वत विकासाला आपले प्राधान्य असून, प्रकल्पांच्या नावाखाली ‘सेटलमेंट’चे राजकारण होत असल्याचा आरोप थोरवे यांनी केला. मात्र, या आरोपांच्या समर्थनार्थ विशिष्ट पुरावे सार्वजनिक झाल्याची माहिती नाही. तटकरे-थोरवे यांच्यातील हा वाद आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वीही सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील संघर्ष न्यायालयीन पातळीवर गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे टोरंट प्रकल्पाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या वादाचे महायुतीतील स्थानिक राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतात, याकडे रायगडच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आता दर ४ मिनिटे २५ सेकंदांनी मेट्रो; मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये वाढ

राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराजीचा स्फोट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तक्रारीचा सूर, देवगिरीवर आमदारांची बैठक

अनिल अंबानी समूहाप्रकरणी ED ची माेठी कारवाई; ५१० कोटींच्या संपत्तीवर टाच

Mumbai : नुकसानभरपाई मालक व भाडेकरूमध्ये समान वाटून घ्या! सिद्धिविनायक मंदिर जमीन भरपाईप्रकरणी आदेश

...तर निवडणुका घ्यायच्याच कशाला? 'गोकुळ' अध्यक्ष निवडीवरून सतेज पाटलांचा संताप