नागपूर : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत असतानाच, नागपूरमधील कामठी येथे एका काश्मिरी विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली. कामठी येथील श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फॉर्मसीत शिक्षण घेणारे पियूष व मोहम्मद वसीम हे विद्यार्थी रविवारी सायंकाळी बाजारातून परतत असताना, रस्त्यावर उभ्या असलेल्या वसीमला काही तरुणांनी त्याला मारहाण केली.
हे दोघे बाजारात गेले असताना, पियूष लघुशंकेला गेला तर रस्त्यावर उभ्या असलेल्या वसीमवर काही युवकांनी संशय घेत विचारपूस सुरू केली. त्यानंतर वसीमला मारहाण करताना पाहून पियूषने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. ओळख पटवण्यासाठी या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमधील मित्रांना बोलावले. त्यानंतरच जमावाने त्यांना सोडले. या प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून चौकशी केली. मात्र, पीडित विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली नाही. ‘ही घटना संशयातून घडली असून कोणतीही हेतूपुरस्सर मारहाण झाली नाही’, असे परिमंडळ क्रमांक ५ चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी स्पष्ट केले.
या मारहाणीचा व्हिडीओ काश्मीरमधून ‘एक्स’ अकाऊंवर प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली.