अलिबाग : खानाव पुलावर भले मोठे भगदाड; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी 
महाराष्ट्र

अलिबाग : खानाव पुलावर भले मोठे भगदाड; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

खानाव गावालगत असणाऱ्या अलिबाग ते रोहा मार्गावरील बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे काम करून रस्त्याच्या मध्यभागी भलेमोठे भगदाड पडलेले आहे.

Swapnil S

अलिबाग: खानाव गावालगत असणाऱ्या अलिबाग ते रोहा मार्गावरील बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे काम करून रस्त्याच्या मध्यभागी भलेमोठे भगदाड पडलेले आहे. प्रत्यक्ष काम न करता शासकीय निधीची अफरातफर, खोटी बिले काढणे आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याबाबत संबंधित ठेकेदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा आणि त्याला काळ्या यादीत टाका, अशी लेखी तक्रार तरुण सामाजिक कार्यकर्ते अँड. राकेश पाटील यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रायगड अलिबाग तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे दाखल केली आहे

अलिबाग ते रोहा रस्त्यावरून रोज हजारो प्रवासी ये-जा करतात. या रस्त्यावर खानाव गावालगत असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने दोन वर्षापूर्वी बांधलेल्या पुलाला मध्यभागी मोठे भगदाड पडलेले असून हा पूल कधीही पडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याचे काम करण्याचा ठेका देण्यात येऊन काम न करताच बिलेही अदा केल्याची माहिती समोर येत आहे. ठेकेदाराने प्रत्यक्षात काम पूर्ण न करताच किंवा अपूर्ण काम पूर्ण झाल्याचे भासवून निधीची बिले काढून घेतल्याची गंभीर बाब निदर्शनाला आली आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.

वाहनचालक, प्रवाशांच्या जीवाला धोका

या रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले असून वाहनचालक व पादचाऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी कर्तव्यात कसूर केली असून सरकारची आर्थिक फसवणूक केली आहे. त्याचबरोबर सामान्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

कामाची स्वतंत्र तांत्रिक गुणवत्ता तपासणी करण्यात यावी. मोजमाप पुस्तिका, बिले, देयक नोंदी, पूर्णत्व प्रमाणपत्र व इतर सर्व कागदपत्रे जप्त करून तपासण्यात यावीत. निधीचा अपहार, फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर, सार्वजनिक सेवकांच्या संगनमताचा पुरावा आढळल्यास गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा अलिबाग-रोहा रस्ता हा अपघातांसाठी कुप्रसिद्ध रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्याच्या ठेकेदाराने काम न करताच बिलाची रक्कम अदा केल्याची चर्चा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची टक्केवारी तरी नक्की किती? खरे तर या विभागाच्या ठेकेदारांच्या बरोबरच अधिका-यांविरोधात जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत, तो पर्यंत हा रस्ता कोणालाही यमाच्या दरबारात पोहोचवू शकतो?
अॅड. राकेश पाटील, प्रवासी

नेपाळमध्ये ३०० भारतीय बेपत्ता; महापुरातील मृतांची संख्या ३५९; राज्यातील ११४ पर्यटक अडकले, ५३ पर्यटक सुरक्षित

Mumbai Metro 7A : आराखड्यातील चुकीमुळे २६० कोटींचा फटका; सल्लागाराच्या निष्काळजीपणावरून MMRDA वर टीका

मुंबईकरांनो, 'स्वाईन फ्लू' बळावतोय; रुग्णसंख्येत होतेय झपाट्याने वाढ, तीन महिन्यांत ३०९ रुग्णांची नोंद

Mumbai : रेल्वे स्थानक परिसर विकासाचे लक्ष्य; आयुक्त अश्विनी भिडेंचे निर्देश; मुलुंड, भांडूप, कांजूरला दिली भेट

गोवंडीतील पालिका शाळेत बकरी अड्डा; नगरसेवक निखिल व्यास यांचा आरोप