CJP Protest : जंतर-मंतरवर प्रवेश करताच दिल्ली पोलिसांची कारवाई; सौरव दास, आशुतोष रांकांसह अजिंक्य शिंदे ताब्यात

'नरेंद्र मोदी, तुम्ही प्रतिकाराचा आवाज अधिकृत यादीतून वगळू शकत नाही,' अशा शब्दांत दिपके यांनी सरकारवर निशाणा साधला.
CJP Protest : जंतर-मंतरवर प्रवेश करताच दिल्ली पोलिसांची कारवाई; सौरव दास, आशुतोष रांकांसह अजिंक्य शिंदे ताब्यात
CJP Protest : जंतर-मंतरवर प्रवेश करताच दिल्ली पोलिसांची कारवाई; सौरव दास, आशुतोष रांकांसह अजिंक्य शिंदे ताब्यात(Photo-X)
Published on: 

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरला अधिकृत आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळण्यात आल्यानंतरही तेथे आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेत्यांना दिल्ली पोलिसांनी मंगळवारी (१३ ऑक्टोबर) ताब्यात घेतले. पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह राष्ट्रीय संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वज हातात घेऊन जंतर-मंतर परिसरात प्रवेश केला होता. या घटनेनंतर CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

जंतर-मंतर आम्ही पुन्हा ताब्यात घेतले; सौरव दास यांची पोस्ट

जंतर-मंतर परिसरात प्रवेश केल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा सौरव दास यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून केला. 'जंतर-मंतर आम्ही पुन्हा ताब्यात घेतले आहे.

आम्ही जंतर-मंतरमध्ये प्रवेश केला आणि आता पोलीस आम्हाला ताब्यात घेत आहेत. मात्र, आपल्या तरुण पिढीसाठी हा एक संदेश आहे. आपण हे करू शकतो!' अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.

'प्रतिकाराचा आवाज अधिकृत यादीतून वगळता येणार नाही'

CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही 'एक्स'वरील पोस्टमधून या कारवाईवर टीका केली. पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रध्वज घेऊन जंतर-मंतर परिसरात दाखल झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे त्यांनी म्हटले. 'नरेंद्र मोदी, तुम्ही प्रतिकाराचा आवाज अधिकृत यादीतून वगळू शकत नाही,' अशा शब्दांत दिपके यांनी सरकारवर निशाणा साधला.

'संपूर्ण देशच बनेल जंतरमंतर'

जंतर-मंतरला अधिकृत आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळण्याच्या निर्णयावर दिपके यांनी नाराजी व्यक्त केली. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी, जंतर-मंतर हे अधिकृत आंदोलनस्थळ राहिले नाही म्हणून आंदोलने थांबतील, असे सरकारला वाटत असेल मात्र तसे होणार नाही, असे म्हटले. 'संपूर्ण देशच बनेल जंतरमंतर,' असा इशाराही त्यांनी दिला.

दिपके पुढे म्हणाले की, सरकारची समस्या केवळ जंतर-मंतर या ठिकाणाशी नसून आंदोलनांशी आहे. त्यामुळे आंदोलनस्थळाच्या अधिकृत यादीतून एखादे ठिकाण वगळले, तरी आंदोलनाचा आवाज दाबता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आशुतोष रांकांचीही पोस्ट

आशुतोष रांका यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत जंतर-मंतरपासून दूर राहण्याचा उल्लेख केला होता. दरम्यान, आंदोलनस्थळाच्या दर्जाबाबत झालेल्या बदलानंतर CJP च्या कार्यकर्त्यांनी जंतर-मंतरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाले असून, त्यामध्ये काही कार्यकर्ते अडथळे आणि गेट ओलांडून परिसरात प्रवेश करताना दिसत असल्याचे वृत्त आहे.

जंतर-मंतरच्या जागी तीन पर्यायी आंदोलनस्थळे

दिल्ली पोलिसांनी सोमवारी जंतर-मंतरला अधिकृत आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याऐवजी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदान ही तीन ठिकाणे आंदोलने आणि निदर्शनांसाठी निश्चित करण्यात आली आहेत.

CJP Protest : जंतर-मंतरवर प्रवेश करताच दिल्ली पोलिसांची कारवाई; सौरव दास, आशुतोष रांकांसह अजिंक्य शिंदे ताब्यात
जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही; दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय, तीन नवी ठिकाणे निश्चित

नागरिकांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलनाचा अधिकार बजावता यावा, यासाठी पर्यायी ठिकाणांचा अभ्यास करण्याकरिता केंद्रीय गृह मंत्रालयाने समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशींनुसार जंतर-मंतरबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. नव्या ठिकाणी आंदोलन आयोजित करण्यासाठी सुधारित मानक कार्यपद्धती (SOP) स्वतंत्रपणे जारी केली जाणार आहे.

CJP Protest : जंतर-मंतरवर प्रवेश करताच दिल्ली पोलिसांची कारवाई; सौरव दास, आशुतोष रांकांसह अजिंक्य शिंदे ताब्यात
जेन-झीला घाबरून सरकारची आणीबाणी; संपूर्ण देशच बंद करून टाका; CJP चा केंद्रावर हल्ला

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP कडून आंदोलन करण्यात येत आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप पक्षाने केला आहे. या मुद्द्यावरून दिल्लीसह देशातील विविध भागांत आंदोलने झाली आहेत. जंतर-मंतरवरील ताज्या घडामोडींमुळे आंदोलनस्थळांच्या नव्या व्यवस्थेवरून आणि आंदोलनाच्या अधिकारावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in